पुणे, पुढारी वृत्तसेवा: घर घेऊन देतो असे सांगून महिलेची 58 लाख रुपयांची फसवणूक व लग्नाच्या आमिषाने तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मेढा येथील एकास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 25 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संतोष पवार (रा. मेढा, सातारा) असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत 34 वर्षीय शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. मार्च 2020 ते जानेवारी 2022 या कालावधीमध्ये हा प्रकार घडला. आरोपीने फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांना म्हाडामध्ये घर घेऊन देतो असे सांगितले.
त्याबदल्यात फिर्यादींकडून 41 लाख 68 हजार 700 रुपये आणि 16 लाख रुपये किमतीचे 40 तोळे सोने असे एकूण 57 लाख 68 हजार 700 रुपये घेतले. फिर्यादी यांना पैशांची मागणी केली असता त्याने लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केला. तू जर माझ्याविरुद्ध तक्रार केली, तर तुझे अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करीन', अशी धमकी त्याने फिर्यादींना दिली होती. आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली.