

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'आत्ताच जामिनावर सुटलोय, पुन्हा सुटून तुझा खेळ खल्लास करतो,' असे म्हणत धमकी देणार्यासह टोळक्याने चतु:शृंगी भागात धुडगूस घातला. त्यानंतर तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून व बिअरच्या बाटल्यांनी मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला. याबरोबरच घरात घुसूनही तोडफोड केली. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात अजय विटकर, विजय विटकर यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक विश्वास चिंचकर यांनी तक्रार दिली आहे.
या घटनेत अभिषेक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तक्रारदार व आरोपींमध्ये जुने वाद आहेत. ते जनवाडीत मित्रांसोबत गप्पा मारत उभे होते. त्या वेळी सिद्धार्थ गायकवाड व तक्रारदार यांच्यात यापूर्वी एकमेकांकडे बघण्यावरून भांडण झाले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. टोळक्याने अभिषेकच्या घरात घुसून वस्तूंची तोडफोड केली. अजय विटकर यांनी हातातील कोयत्याने डोक्यात वार केले, तर विजय विटकरने दारूच्या बाटल्या डोक्यात घालून खुनाचा प्रयत्न करत दहशत पसरवली.