भीमाशंकर, पुढारी वृत्तसेवा : माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांचे माळीण फाट्यावर पत्र्याचे निवारा शेड बांधून तात्पुरते पुनर्वसन केले. त्यानंतर आंंमडे गावच्या हद्दीत नवीन माळीण गाव वसवले. मात्र, पाण्यासारख्या प्राथमिक जीवनावश्यक गोष्टीसाठी अद्यापही वणवणच करावी लागत आहे. ज्या पाण्याने आयुष्य उद्ध्वस्त केले, ते अजूनही वणवणच करायला लावत आहे.
पुनर्वसित गावात नवीन 68 घरे बांधली. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 1 एप्रिल 2017 रोजी लोकार्पण सोहळा करून लोकांना नवीन घरे दिली. मात्र, मोठा पाऊस पडला की माळीणकर पुन्हा दचकतात. नवीन पुनर्वसन गावठाणात घरांना कोणताही धोका नाही. परंतु छत व भिंती आजही पाझरत आहेत.पिण्याच्या पाण्याची समस्या मात्र कायम आहे. माळीण पुनर्वसन गावासाठी केलेल्या पाणीपुरवठा योजनेत आजही पुरेसे पाणी मिळत नाही. भरउन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा होतो. सध्या पावसाळ्यातही 9-10 दिवसांनी पाणी येते, त्यामुळे पाण्यासाठी वणवण करत हातपंपाचा आसरा घ्यावा लागत आहे.
नदीतील विहिरीला आडवे बोअर मारले तर पाणी मिळु शकते. जुन्या गावठाणापलीकडील वाड्या-वस्त्यांवर शेती असल्याने शेताला जाण्यासाठी रस्त्याची फार मोठी गैरसोय होत आहे. यामुळे पावसात गाळातून जावे लागते. अनेक वर्षे मागणी करूनही रस्ता केला गेला नाही, त्यामुळे माळीण फाटा ते नवीन गावठाण रस्ताही चालण्याजोगा राहिला नाही, असे कमाजी पोटे यांनी सांगितले.
नवीन गावात आम्हाला घरे मिळाली नाहीत, अशी तक्रार कमल जनार्दन लेंभे व अनसाबाई भीमराव झांजरे या कुटुंबाने मांडली. माळीणमध्ये त्यांचे सामाईक घरे होते. दुर्घटनेच्या काही दिवस अगोदर नवीन घर बांधून पूर्ण झाले होते. घराची नोंद ग्रामपंचायत दप्तरी घातली नव्हती. नवीन पुनर्वसन गावठाणात दीराला घर मिळाले मात्र त्यांच्या घराची नोंद नसल्याने त्यांना घर मिळाले नाही, असे त्या सांगतात. आता घरकुले मंजूर आहेत, परंतु जागा उपलब्ध करून दिली नाही. आपली कैफियत मांडताना अनसाबाई झांजरे यांना रडू कोसळत होते. आम्ही मेलो आहोत की जिवंत हे पहायलाही प्रशासन, नेत्यांमधील कोणीही येत नसल्याचे त्या सांगत होत्या.
आमचा विचार कोणीच करत नाय, आम्ही जिवंत हाय की मेलोय हे पहायला बी कोणी येत नाय. घरकुलाला गावात आमच्याकडे जागा पण नाय, जी जाग आहे ती शेताकडं, तीकडं डोंगराकडं आम्ही एकटं कसं रहाणार. शेड सोडले तर जायचं कुठं? नवीन घरकुल बांधल्याशिवाय शेड सोडणार नाय.
– कमल लेंभे, दुर्घटनाग्रस्त महिला.