पुणे : पुढील आठवड्यात विशेष ग्रामसभा; ग्रामविकास विभागाचा आदेश

पुणे : पुढील आठवड्यात विशेष ग्रामसभा; ग्रामविकास विभागाचा आदेश

पुणे, पुढारी वृत्तसेवा: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 25 ते 29 जुलै यादरम्यान विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याबाबत ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना आदेश दिले आहेत. घरोघरी तिरंगा उपक्रम, जलजीवन मिशन आणि कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. दरम्यान, स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने 11 ते 17 ऑगस्ट यादरम्यान घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. घरोघरी तिरंगा उत्सव प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा असून, या कालावधीमध्ये गावातील सर्व नागरिकांनी ग्रामपंचायत येथून तिरंगा ध्वज विकत घेऊन आपल्या घरावर सन्मानाने तो लावण्याचा उपक्रम करायचा आहे. हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन या ग्रामसभेत करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर शंभर टक्के नळजोडणी झालेल्या गावांमध्ये हर घर जल घोषित करण्याबाबत ग्रामसभेचा ठराव घेण्यात येणार आहे. तसेच, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला डोस झालेल्या बारा वर्षांवरील बालकांना निकषानुसार दुसरा डोस आणि अठरा वर्षांवरील नागरिकांना दुसर्‍या डोसनंतर सहा महिन्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर मोफत प्रतिबंधात्मक दक्षता (बूस्टर) डोस घेण्याबाबत जनजागृती या ग्रामसभेत करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news