पुणे : ‘पीएमपी’मधून धूर; प्रवाशांची पळापळ!

पुणे : ‘पीएमपी’मधून धूर; प्रवाशांची पळापळ!

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे स्टेशन डेपोत ई-बसमधून धूर निघण्याची घटना ताजी असतानाच रविवारी सकाळी 7 वाजता स्वारगेटवरून धायरी मारुती मंदिराच्या दिशेने जाणार्‍या (क्रमांक 117) पीएमपी बसच्या इंजिनमधूनच धूर निघाला. चालू गाडीतून अशा प्रकारे धूर निघाल्यामुळे प्रवासी घाबरले अन् त्यांची चांगलीच पळापळ झाली. पूर्वी पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या बसगाड्यांना मोठ्या प्रमाणावर रस्त्यामध्येच आगी लागायच्या. त्यावेळी पीएमपीच्या तत्कालीन अध्यक्षा नयना गुंडे यांनी यावर उपाययोजना करण्यासाठी एक तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती.

या समितीने केलेल्या नियोजनामुळे बसला आग लागण्याच्या घटना काही प्रमाणात कमी झाल्या. मात्र, तरीही बसगाड्यांना आग लागतच होत्या. त्यानंतचे पीएमपीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांनी यावर उपाय म्हणून ताफ्यातून आयुर्मान संपलेल्या बस स्क्रॅप केल्या आणि नवीन ई-बस खरेदीवर भर दिला. आत्ताचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी तर ताफ्यातील डिझेलवर धावणार्‍या मोठ्या सर्व बस ताफ्यातून काढून टाकल्या आहेत. आता फक्त डिझेलवरील मिडी बस पीएमपीच्या ताफ्यात आहेत. आगीच्या घटनावर पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा काय उपाययोजना करणार, हे आता पाहावे लागणार आहे.

अचानक धूर येत असल्याने घाबरलो…
मी सकाळी धायरीला घरी निघालो होतो. याच वेळी विठ्ठलवाडी परिसरात बस आल्यावर गाडीच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी आम्ही चालकर-वाहकास सांगितले. बसच्या इंजिनमधून धूर आल्यामुळे आम्ही चांगलेच घाबरलो होतो. त्यानंतर बसमधून उतरल्यावर दुसर्‍या बसमधून पुढील प्रवास केला, असे एका प्रवाशाने दै.'पुढारी'शी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news