पुणे : पीएमपीच्या उफराट्या कारभारामुळे वाहतूक अभ्यासक नाराज

पुणे : पीएमपीच्या उफराट्या कारभारामुळे वाहतूक अभ्यासक नाराज
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे : एका मोठ्या ई-बसमध्ये 50 प्रवासी प्रवास करू शकतात, तर कॅबमध्ये फक्त 5… म्हणजेच 50 प्रवाशांसाठी 10 कॅब लागतील. साहजिकच, एका बससाठी रस्त्यावर कमी जागा लागेल, तर 10 कॅबसाठी रस्त्यावर 4 ते 5 बसची जागा लागेल. परिणामी, पीएमपीच्या खासगी कॅबमुळे शहराच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात वाढ होणार आहे. आगामी काळात पीएमपीकडून शहरात खासगी कॅब खरेदी करून प्रवासी सेवा पुरविण्याचे नियोजन सुरू आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून प्रवास करणार्‍यांची संख्या वाढवून शहरातील खासगी वाहने कमी करणे, खासगी वाहने कमी करून प्रदूषण, वाहतूक कोंडी कमी करणे, हे पीएमपीचे उद्दिष्ट आहे.

मात्र, खासगी कॅब सेवा सुरू करून पीएमपी उरफाटा कारभार करीत असल्याचा आरोप प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. शहरात पीएमपीने कॅब सेवा सुरू केली, तर आधीच 43 लाख वाहनसंख्या असताना त्यात आणखी वाहनांची भर पडणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात वाढ होणार आहे. परिणामी, आपोआपच आरोग्याच्या समस्या वाढणार असून, पुणेकरांचे आयुर्मानदेखील कमी होणार आहे. त्यामुळे पुणे शहरातील खासगी वाहने कमी करून जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर व्हावा, यासाठी महापालिका स्तरावर काम सुरू आहे. मात्र, पीएमपीच याला हरताळ फासत असल्याचे समोर आले आहे. पीएमपीमार्फत कॅब सेवा पुरविण्यासंदर्भातील प्रस्ताव असून, या प्रस्तावाला संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळालेली नाही.

अशी आहे कॅब योजना
पीएमपी ताफ्यातील भाडेतत्त्वावरील बसप्रमाणेच सुमारे 100 ते 200 कॅब खरेदी करणार आहे. त्याद्वारे पीएमपी शहरात बसगाड्यांसोबतच टॅक्सी सुविधा देखील पुरविणार आहे. ही सेवा ओला-उबेर टॅक्सीप्रमाणेच पुणेकरांना ऑनलाइनच बुक करता येणार असून, ऑनलाइनच प्रवासी भाडे देता येणार आहे.

बससारख्या एका वाहनात चारचाकीपेक्षा कित्येक पटीने जास्त प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता असते. असे असताना कॅबचा घाट कशाला? पीएमपीला वाहतुकीच्या मूलभूत तत्त्वांचा विसर पडला आहे.
                                   – प्रांजली देशपांडे, वाहतूक अभ्यासक, पीएमपीएमएल

आहे तेच धुता येईना अन् खासगी कॅबचा घाट घातला जात आहे. पीएमपीचे अध्यक्ष पीएमपीचा मुख्य उद्देश विसरले आहेत. तुघलकी निर्णय घेतला जात आहे. यामुळे वाहनांच्या कोंडीत आणि प्रदूषणात वाढ होणार आहे.
                                      – संजय शितोळे, मानद सचिव, पीएमपी प्रवासी मंच

कोरोनाने आमचे अगोदरच मोठे नुकसान झाले आहे. त्यात पीएमपी कॅब सुरू करून आमचा धंदाच बंद करीत असल्याचे दिसते. अगोदरच्या वाढत्या कॅबच्या संख्येने आमच्या-आमच्यातच मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
                                             – शिवाजी खांदवे, अध्यक्ष, साईनाथ टॅक्सी संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news