पुणे : पीएमपीच्या ई-बसची वारंवार ‘बॅटरी लो’; चार्जिंग टिकण्यासाठी केला जातोय एसी बंद

पुणे : पीएमपीच्या ई-बसची वारंवार ‘बॅटरी लो’; चार्जिंग टिकण्यासाठी केला जातोय एसी बंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पीएमपीच्या ताफ्यात नव्यानेच दाखल झालेल्या अनेक ई-गाड्यांची 'बॅटरी लो' होत असल्याचे दिसत आहे. या गाड्या सातत्याने चार्जिंग संपल्यामुळे रस्त्यातच बंद पडत आहेत, तर चालक-वाहक बॅटरी लवकर उतरू नये, याकरिता ई-बसचा एसी चक्क बंद करत आहेत. शहरातील सार्वजनिक वाहतूक पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त व्हावी, याकरिता पीएमपीने नव्या इलेक्ट्रिक गाड्यांची खरेदी केली आहे. मात्र, या गाड्यांना आता चार्जिंग लगेचच उतरण्याची समस्या निर्माण झाली आहे.

बसचे चार्जिंग लवकर उतरल्यामुळे या गाड्या रस्त्यातच बंद पडत असून, प्रवाशांनादेखील निम्म्यातच आपला प्रवास थांबवावा लागत आहे. परिणामी, दुसरी गाडी येईपर्यंत प्रवाशांना वाट पहावी लागत आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने गाड्या संपूर्ण चार्जिंग झाल्याशिवाय डेपोतून बाहेर काढू नयेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान पीएमपीच्या विद्युत अभियंत्यांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, 'सध्या पॉवर सप्लाय कमी आहे. परंतु, मनपाच्या आणि महावितरणच्या मदतीने तो वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.'

चार्जिंगअभावी गाड्या आगारातच
पीएमपी प्रशासनाच्या ई-गाड्यांच्या चार्जिंग स्टेशनला पॉवर सप्लाय मिळत नसल्याचे कारण पीएमपीने दिले आहे. हा सप्लाय न मिळाल्यामुळे पीएमपीच्या नव्या 130 ई-गाड्या चार्जिंगअभावी रस्त्यावर आणता येत नाहीत. परिणामी त्या आगारातच उभ्या आहेत.

इतक्या आहेत ई-बस
सध्या ताफ्यातील ई-बस 305
ऑन रोड 299
आणखी नव्या दाखल होणार 350
आगामी काळातील एकूण ई-बस 650

आमच्या ई-गाड्यांना विद्युतपुरवठा अपुरा पडत आहे. त्यासंदर्भात आम्ही महावितरणकडे मागणी केली आहे. व्यवस्थित पुरवठा झाल्यास ई-बसची सेवा व्यवस्थित पुरवता येईल. त्याकरिता आम्हाला तातडीने विद्युतपुरवठा करणे गरजेचे आहे.

                                                   – दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

पीएमपीने मागितला तेवढा विजेचा पुरवठा आम्ही दिलेला आहे. आणखी पुरवठा हवा असल्यास आम्हाला पत्र द्यावे. आम्ही तत्काळ नियमानुसार लगेचच पुरवठा करू.

                                               – भारत पवार, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

पीएमपीला असा मिळतोय पॉवर सप्लाय
(किलो व्हॅट अ‍ॅम्पिअरमध्ये)
ई- डेपोचे नाव आवश्यक सप्लाय मिळालेला सप्लाय
निगडी 3000 केव्हीए 3000 केव्हीए
भेकराईनगर 5500 केव्हीए 5500 केव्हीए
पुणे स्टेशन 5700 केव्हीए 1500 केव्हीए
वाघोली 6200 केव्हीए 2500 केव्हीए
बाणेर 4500 केव्हीए 1200 केव्हीए

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news