

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दहा वर्षांपूर्वीच्या आणि पूर्णत: खिळखिळ्या झालेल्या सीएनजीवरील 84 बस पीएमपी प्रशासनाने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांचे आणखी हाल होणार आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत पीएमपीच्या ताफ्यात 3 हजार 500 गाड्या आवश्यक आहे. मात्र, सध्या पीएमपीकडे 2 हजार 53 गाड्या आहेत. त्यातही केवळ 1600 गाड्या मार्गावर सेवा पुरवितात. तर, उर्वरित देखभाल दुरूस्ती आणि स्पेअरसाठी डेपोत उभ्या असतात. त्यामुळे गाड्या अपुर्या पडत आहेत.
रस्त्यावर सातत्याने बंद पडून प्रवाशांची गैरसोय करणार्या 10 वर्षांपुढील 84 सीएनजी बस स्क्रॅप करण्यात येणार आहेत. या बसची पाहणी करण्यात आली आहे. त्या पूर्णत: खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
– सुबोध मेडशीकर, जनरल मॅनेजर, पीएमपीएमएल
बसची संख्या वाढवण्याची मागणी
लोकसंख्येच्या गणितानुसार शहरात बसगाड्यांचा पुरवठा करावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रवासी तज्ज्ञांकडून केली जात आहे. मात्र, ही मागणी अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. परिणामी, शहरातील बसथांब्यांवर वेळेत बस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बहुतांश पुणेकर आपली खासगी वाहने वापरण्यावर भर देत आहेत. यामुळे शहरात गाड्यांची संख्या व प्रदूषण वाढत आहे. हे थांबविण्यासाठी पीएमपीने ताफ्यातील गाड्यांची संख्या वाढवायला हवी, असे मत प्रवासी तज्ज्ञांनी व्यक्त केले. पीएमपीने आता ताफ्यातील 84 बस स्क्रॅप करण्यासाठी काढलेल्या आहेत. या लवकरच स्क्रॅप करण्यात येणार आहेत. त्यातच आणखी 382 सीएनजीवरील बस खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यादेखील बस पीएमपी आगामी काळात स्क्रॅप करण्याच्या तयारीत आहेत.