

पिंपरखेड, पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे सोमवारी (दि. 29) महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अष्टशताब्दी अवतार दिन महोत्सव विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी पंचक्रोशीतील साधू, संत, महंत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी भाषेला समृद्ध करणारा संप्रदाय म्हणून महानुभाव संप्रदायाची ओळख असून, या संप्रदायाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतरणास 800 वर्षे पूर्ण होत असल्याने अष्टशताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी तयार करण्यात आलेल्या जवळपास 80 हून अधिक अन्नपदार्थांच्या उपाहारासह विडा अवसर आणि कलशधारी महिलांची गावातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
सकाळच्या सत्रात मूर्तीस मंगल स्नान घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. तद्नंतर ध्वजारोहण, प्रसादवंदन, पंचावतार उपहार आदी कार्यक्रम झाले. या अवतार दिनाला 800 वर्षे पूर्ण झाल्याने महानुभावपंथीय भाविकांनी हा सुवर्णयोग साधून आल्याची भावना या वेळी व्यक्त केली. या प्रसंगी महाआरतीने कार्यक्रमाची सांगता होऊन प्रख्यात असणार्या आण्याच्या आमटीचा महाप्रसाद सर्वांना देण्यात आला. सुमारे 800 पेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे नियोजन प. पु. प. म. संदीपबाबा शास्त्री परांडेकर, प. पु. प. म. कान्हेराजबाबा वायंदेशकर, प. पु. प. म. वकील महात्मे यांच्यासह सर्व महंतांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. श्री दत्त सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम नियोजन करून सर्व व्यवस्था पाहिली.