वेल्हे, पुढारी वृत्तसेवा : जोरदार पाऊस पडणार्या वेल्हे तसेच पश्चिम हवेली तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून कडकडीत ऊन पडत आहे. त्यामुळे भात पिकांसह खरीप पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी भात खाचरे कोरडी पडू लागली आहेत. पाण्याअभावी भात पीक पिवळे पडले आहे. उर्वरित भात रोपांच्या लागवडीही खोळंबल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
नदी, ओढ्याच्या काठावरील हा भात खाचरातही जेमतेम पाणी शिल्लक आहे. सर्वात गंभीर स्थिती मांगदरी, वांगणी परिसरात निर्माण झाली आहे. माळरानावरील भात खाचरे कोरडी पडल्याने लागवड केलेली भात रोपे पिवळी पडली आहे. मांगदरी येथील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तानाजी मांगडे म्हणाले, तीन चार दिवसांत चांगला पाऊस न पडल्यास भात पीक वाया जाणार आहे.
भाताच्या वाढीसाठी खाचरात पुरेसा पाणीसाठा आवश्यक आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे भातासह भुईमूग, कडधान्य आदी पिकांवर परिणाम झाला आहे.
कादवे, रांजणे, पानशेत, ओसाडे, निगडे, आ़ंबेड आदी ठिकाणी ओढे, नाले आदी ठिकाणचे पाणी पंपाने उपसून तसेच पाट काढून भाताला देण्यासाठी शेतकर्यांची धावपळ सुरू आहे. वेल्हे तालुक्यात साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र भाताच्या लागवडीखाली आहे. त्यापैकी जवळपास पाच हजार हेक्टर क्षेत्रावर भात रोपांची लागवड पूर्ण झाली आहे. वेल्हे तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर म्हणाले, तालुक्यात जवळपास नव्वद टक्के भात लागवड झाली आहे. उर्वरित दहा टक्के लागवडीसाठी तसेच लागवड केलेल्या पिकांसाठी पावसाची गरज आहे.
पश्चिम हवेलीतील घेरा सिंहगड, खामगाव मावळ, कल्याण, मोगरवाडी, खानापूर, मणेरवाडी परिसरात अशीच स्थिती आहे. मोगरवाडी येथील शेतकरी लक्ष्मण दारवटकर म्हणाले, यंदा एक महिना उशिरा पडल्याने भात रोपांची उगवण चांगली झाली नाही. त्यानंतर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भात रोपांचा तुटवडा निर्माण झाला. हवेली तालुका कृषी अधिकारी मारुती साळे म्हणाले, जवळपास सत्तर टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर भात लागवडी झाल्या आहेत. पावसाअभावी उर्वरित रोपांच्या लागवडी रखडल्या आहेत. पंपाने सिंचन करून काही भागात भात लागवड केली जात आहे.