पुणे : पतसंस्थांनाही ‘सीआरएआर’; सहकार आयुक्तालयाच्या सूचना जारी

पुणे : पतसंस्थांनाही ‘सीआरएआर’; सहकार आयुक्तालयाच्या सूचना जारी
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील सर्व बिगर कृषी सहकारी पतसंस्थांना सन 2022-23 या आर्थिक वर्षापासून नागरी सहकारी बँकांप्रमाणेच भांडवल पर्याप्ततेचे (सीआरएआर) प्रमाण लागू करण्याचा निर्णय सहकार आयुक्तालयाने घेतला आहे. सर्व बिगर कृषी पतसंस्थांना या निकषांच्या काटेकोर पालनाच्या सूचना सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिल्या आहेत. ज्या संस्थेच्या जिंदगीचा, मालमत्तेचा दर्जा उत्तम आहे व भांडवल तथा स्वनिधीचे जोखीमभारीत मालमत्ता, जिंदगीशी असलेले प्रमाण (सीआरएआर) नऊ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, अशी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम समजण्यात येते. त्यामुळे ठेवीदारांनाही ठेव ठेवण्यापूर्वी सीआरएआर पाहून निर्णय घेता येणे शक्य होणार असल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.

पतसंस्थांचे स्वनिधी हे संस्थेच्या आर्थिक अडचणीच्या वेळी किंवा आपत्कालीन स्थितीत आघात प्रतिबंध म्हणून कार्य करीत असतात. संस्थेकडे असलेल्या पुरेशा भांडवल निधीमुळे संस्थेच्या ठेवीदारांची विश्वासार्हता वाढण्यात मदत होते. संस्थेच्या विविध मालमत्ता काही प्रमाणात जोखमीच्या असतात व जोखीम पेलण्याइतपत पुरेसे भांडवल संस्थेकडे असणे आवश्यक आहे. संस्थेच्या मालमत्तेवर जोखीमनुसार संस्थेला किती भांडवल अथवा स्वनिधी लागेल, याची माहिती ही सीआरएआर या संकल्पनेवरून समजते. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम 35 नुसार संस्थेस बाहेरील कर्ज किंवा सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याच्या मर्यादेचे प्रमाण निश्चित केले आहे.

संस्थेचे वसूल भागभांडवल, संचित राखीव निधी व इमारत निधी यातून संचित तोट्याच्या रकमा वजा जाता शिल्लक राहिलेल्या एकूण रकमेच्या बारापटींपेक्षा अधिक होईल इतक्या रकमेची जबाबदारी कोणतीही पतसंस्था पत्करणार नाही. म्हणून संस्थेच्या ताळेबंदातील मालमत्ता, जिंदगी बाजूदेखील त्याच मर्यादेत राहते. रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांना, भांडवल निधीचे जोखीम भारीत जिंदगीशी असलेले प्रमाण तथा सीआरएआर नऊ टक्के इतके ठेवण्याबाबत सूचित केले आहे.

त्याच पध्दतीने पतसंस्थांमधील सभासद येणे कर्ज, या प्रमुख व इतर सर्व अन्य मालमत्तेतील असलेली जोखीम विचारात घेता पतसंस्थांनासुध्दा सीआरएआर हा निकष लागू करणे आवश्यक आहे. पतसंस्थांना हे निकष लागू करण्याबाबत पतसंस्था नियामक मंडळाच्या बैठकीत सूचित केले आहे. सक्षम व उत्तम व्यवस्थापन याबाबतचे निकष ठरविताना आणि संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षण वर्गवारी गुणांकन तक्त्यामध्ये अन्य निर्धारित केलेल्या निकषांबरोबरच सीआरएआर या निकषाचा प्राधान्याने विचार करणे आवश्यक आहे.

निकष नागरी सहकारी बँकांप्रमाणेच…
पतसंस्थांनी सीआरएआर कशा पध्दतीने काढावे, यासाठी मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. स्वनिधी काढताना 'अ' मधून 'ब' या बाबी वजा कराव्यात, असे म्हटले आहे. 'अ'मध्ये स्वनिधी काढताना वसूल भागभांडवल, राखीव निधी, इमारत निधी, लाभांश समीकरण निधी, गुंतवणूक चढ-उतार निधी, उत्तम जिंदगी-उत्पादक कर्जावरील तरतूद, शिल्लक नफा अधिक चालू वर्षातील नफ्यातून अंदाजित लाभांश वजा जाता शिल्लक नफा आणि अनुत्पादक कर्जे तथा एनपीए ज्यादा तरतूद केली असल्यास या बाबींचा समावेश आहे. तर 'ब'मध्ये संचित तोटा, कमी केलेली एनपीए तरतूद, कमी केलेली थकव्याज तरतूद, कराव्या लागणार्‍या; परंतु न केलेली खर्चाची तरतूद यांचा समावेश असून, आणखी काही निकषही नमूद करण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news