पुणे; पुढारी वृत्तसेवा: क्रेडिट कार्ड पाहण्यासाठी घेत, ते स्वाईप करून 2 लाख 77 हजार रूपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पंचतारांकित हॉटेलबाबतच्या विविध ऑफर सांगून हा प्रकार केल्याप्रकरणी कोर्टी यार्ड हॉलिडेज वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष कुमार अरोरा, साही अलम, दीपक कौशल, प्रभांशू गौर, अकशित कक्कर, रेहान मलिक, गजेंद्र सिंग, वंश ठाकूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत रितेशकुमार अशोककुमार बजाज (46, रा. टकसन इस्टेट फेज2, रेडिसन ब्लू, खराडी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 1 ऑक्टोबर 2021 ते 30 ऑगस्ट 2022 दरम्यान घडला.
कोर्टी यार्ड वर्ल्डचा संशयित रेहान मलिक याने बजाज यांना फोन करून मेरियट हॉटेलच्या मेंबरसाठी आकर्षक ऑफर असल्याचे सांगितले. हयात हॉटेल येथे बोलवून गजेंद्र सिंग आणि वंश ठाकूर यांनी फिर्यादी बजाज आणि त्यांच्या पत्नीला पंचतारांकित हॉटेलमध्ये निम्म्या किमतीत 100 दिवसांचे पॅकेज सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
याच दरम्यान बजाज यांच्याजवळील क्रेडिट कार्ड पाहण्यासाठी मागून त्याने ते स्वाईप करून त्यातून 2 लाख 77 हजार रूपये काढून घेत फसवणूक केली. तसेच इतर संशयित आरोपींनी हे पैसे परत करण्याचा बहाणा करून बजाज यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचे व अद्यापपर्यंत पैसे परत केले नसल्याचे नमूद केले आहे. हा गुन्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर दाखल झाला आहे.