

पुणे; पुढारी वृत्तसेवा: रेल्वेस्टेशन म्हणू नका, मोठ-मोठ्या टेकड्या म्हणू नका, कार चालवतानासुध्दा आजची तरुणाई सर्रासपणे इन्स्टाग्राम व्हिडीओ काढत आहे. यात भर म्हणजे आता तरुणाई पुण्याची सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपीच्या धावत्या बसमध्ये देखील धोकादायकरीत्या रील्स व्हिडीओ बनवत असल्याचे समोर आले आहे.
इन्स्टाग्राम व्हिडीओच्या आहारी गेलेली तरुणाई व्हिडीओ बनवून त्यांना लाइक्स मिळावेत, याकरिता कुठेही व्हिडीओ तयार करीत आहे. पूर्वी टिकटॉक व्हिडीओंचे इतके वेड लागले होते, की पीएमपीचे चालक-वाहक देखील बसमध्येच टिकटॉकचे व्हिडीओ तयार करून टिकटॉक अॅपवर अपलोड करीत होते. पीएमपी प्रशासनाने सक्त ताकीद दिल्यानंतर अशा प्रकारचे व्हिडीओ बनविणे बंद झाले. आता पुन्हा शहरातील तरुणाईच पीएमपी बसमध्ये धोकादायकरीत्या रील्स व्हिडीओ बनवत असल्याचे समोर आले आहे.
स्पायडरमॅनचा धोकादायक व्हिडीओ व्हायरल
हॉलिवूड सुपर हिरो स्पायडरमॅनचा पोशाख परिधान करून चक्क एका तरुणाने पीएमपीच्या बसमध्येच रील्स व्हिडीओ बनविला आहे. या व्हिडीओमध्ये हा तरुण विविध प्रकारच्या धोकादायक कसरती करतो. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
एसटी बसचे चालकही सुसाट…
इन्स्टाग्रामवर सध्या एसटी महामंडळाच्या गाड्यांचेच सर्वाधिक रील्स व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महामार्गावरून सुसाट धावणारी लालपरी, इलेक्ट्रिक एसटी बस यासह अनेक एसटी महामंडळाच्या बसचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. चालक गाडी चालवत असतानाचे देखील अनेक व्हिडीओ आहेत. गाडी चालवताना अशा प्रकारचे व्हिडीओ काढणे धोकादायक असून, मोठा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे एसटी प्रशासनाने अशा रील्स बनविणार्या चालकांना सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
'फक्त प्रवास करा, व्हिडीओ बनवू नका'
पीएमपीच्या बसद्वारे तरुणाईने फक्त प्रवासच करावा. कोणत्याही प्रकारचे धोकादायक व्हिडीओ बनवू नये. असे करताना आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पीएमपीच्या अधिकार्यांमार्फत करण्यात आले आहे.