

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'सुपर मार्केटमध्ये द्राक्ष वाईनची विक्री करण्यास महाविकास आघाडी सरकारने परवानगी दिली होती, परंतु या निर्णयाच्या अंमलबजावणीत अडचणी आल्या,' अशी खंत माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या 62 व्या वार्षिक मेळाव्यात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. कृषी आयुक्त धीरज कुमार, संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, खजिनदार सुनील पवार, सोपान कांचन यांच्यासह द्राक्ष शास्त्रज्ञ व अन्य उपस्थित होते. यावेळी द्राक्ष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
पवार म्हणाले, 'महाराष्ट्रातील एकूण द्राक्ष उत्पादनांपैकी फक्त आठ टक्के द्राक्ष आपण निर्यात करतो. उर्वरित उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विक्री होते. त्यामुळे सद्यस्थितीत स्थानिक द्राक्ष बाजारपेठ मजबूत करणे हे आव्हान आहे. देशाला मार्गदर्शक ठरेल असं काम द्राक्ष बागायतदार संघाने उभे केले आहे. द्राक्ष उत्पादकांच्या अडचणींवर राज्य सरकार, राज्य सरकारचे विभाग आणि द्राक्ष बागायतदार संघाने एकत्रित बसून मार्ग काढला पाहिजे.'
धीरज कुमार म्हणाले, 'भारतातून होणार्या एकूण द्राक्ष निर्यातीपैकी सुमारे 98 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. भारताच्या कृषी क्षेत्राच्या वाढीचा दर हा 18 टक्के आहे. कनाशिक येथे क्लस्टर विकासासाठी शंभर कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 'शिवाजी पवार म्हणाले, बेदाणा निर्मिती रॅकसाठी अनुदान, द्राक्ष विक्रीत सुसूत्रता येण्याकरिता व्यापार्यांवर नियंत्रण ठेवू शकेल, अशी यंत्रणा व बागायतदारांसाठी मार्केट इंटिलिजन्स व्यवस्था निर्माण करणे तसेच अपेडा, शेतकरी उत्पादक कंपन्या, निर्यातदार यांच्या समन्वयातून ठोस निर्यात धोरण ठरविणे गरजेचे असल्याची अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.