

वाल्हे, पुढारी वृत्तसेवा : वाल्हे, दौंडज परिसरातील नागरिकांना बुधवारी (दि. 27) उष्णतेने हैराण केले होते. सकाळपासूनच उष्णता नेहमीपेक्षा अधिक होती. मात्र, दुपारी अडीच ते तीन वाजच्या दरम्यान वातावरण अचानक बदलले व ढगांच्या गडगडासह दौंडज परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे खरिपाची पेरणी केलेल्या शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला.
शेतामध्ये अनेक ठिकाणी थोडेफार पाणी साचले होते. यामुळे दौंडज परिसरातील शेतकरीवर्ग आतुरतेने वाट पाहत असलेला पाऊस अनपेक्षितपणे पडल्याने दौंडज परिसरातील शेतकरीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, या वेळी वाल्हे परिसरात पावसाची रिमझीम सुद्धा झाली नसल्याने वाल्हे येथील शेतकरीवर्गामध्ये 'दौंडज येथे पावसाचा आखाड; वाल्हे येथे मात्र उपवासच'…! असे म्हणत पावसाबद्दल चिंता व्यक्त करीत खरीप हंगाम अद्याप धोक्यात असल्याचे वाल्हे येथील शेतकरीवर्गाने सांगितले.
दरम्यान, दौंडज (ता. पुरंदर) परिसरात बाजरीची पेरणी जुलै महिन्यात सुरूवातीला पालखी गेल्यानंतर अनेक शेतकर्यांनी थोड्या ओलीवर केली होती. अनेकांची बाजरी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, भुईमूग आदी पिकांना पाण्यांची नितांत गरज होती. अशातच अनपेक्षितपणे बुधवारी दुपारी समाधानकारक पाऊस झाल्याने, आमच्या खरीप हंगामातील पिकांना याचा फायदा होईल. सद्यस्थितीत दौंडज परिसरात अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. आजच्या पावसाने फक्त खरीप हंगामातील पिकांना एक पाणी मिळाले
असून, भविष्यात जोरदार पाऊस पडला, तरच या परिसरातील विहिरींना पाणी येईल. अन्यथा पावसाळ्यातच ट्रॅक्टर सुरू करण्याची गरज निर्माण होईल, असे दौंडजचे शेतकरी रमेश घोगरे यांनी सांगितले.