पुणे : दोन घरफोड्यांत साडेअकरा लाखांचा ऐवज चोरीला

File Photo
File Photo

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील घरफोड्यांचे सत्र काही केल्याने थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही. दोन घरफोड्यांत चोरट्यांनी 11 लाख 43 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरी करून पोबारा केला. एका बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिने व विदेशी चलन चोरी केले, तर तांब्याची भांडी तयार करणार्‍या कारखान्यातून तांब्याच्या धातूची पाने चोरी केली. वसंत विला तात्यासाहेब तालीमपथ चित्तळे कॉर्नरसमोर, डेक्कन जिमखाना येथील एका 44 वर्षीय महिलेच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारून सोन्याचे दागिने, रोकड, अमेरिकन डॉलर, ब्रिटन पाउंड असा 8 लाख 53 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला.

याप्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार डेक्कन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 21 ते 24 जुलै 2022 या कालावधीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या भावाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे त्या त्यांच्या घरातील कुटुंबीयासह मुंबई येथे गेल्या होत्या. चार दिवस त्यांचे राहते घर बंद होते. त्याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी फिर्यादींच्या घराच्या ग्रिलच्या दरवाज्याला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर मास्टर बेडरुमधील कपाट उचकटून रोकड, सोन्याचे दागिने असा ऐवज चोरी करून पळ काढला.

फिर्यादी या मुंबईहून पुण्यात घरी परतल्या तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. तसेच अरिहंत मार्ग कारखाना गल्ली सुखसागरनगर कात्रज परिसरातील हिरा इंडस्ट्रीज नावाने तांब्याची भांडी तयार करणार्‍या कारखान्यातून चोरट्यांनी 2 लाख 90 हजार रुपयांचा साडेतीनशे किलो तांब्याचा पत्रा चोरी केला. ही घटना 23 ते 24 जुलै 2022 या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी हेमंत रमेश पालेशा (वय 50, रा. महात्मा फुले पेठ, सेव्हन लव्हज चौकाजवळ) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तांब्याच्या धातूची पाने लंपास
पालेशा यांची येथील परिसरात तांब्याची भांडी तयार करण्याचा कारखाना आहे. चोरट्यांनी त्यांच्या कारखान्याच्या प्रेसरूममधील छताचा पत्रा कापून उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर तांब्याच्या धातूची पाने असलेली पाच पोती चोरी करून पळ काढला. दरम्यान, हा प्रकार दुसर्‍या दिवशी समजल्यानतर पालेशा यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. भारती विद्यापीठ पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news