

वाफगाव, पुढारी वृत्तसेवा : शिक्षकांच्या बदल्या अनेकदा वादग्रस्त ठरतात. यातून सुटका म्हणून शासनाने 2018 पासून ऑनलाईन बदल्या करण्यास सुरुवात केली. परंतु, कोरोनामुळे दोन वर्षांपासून बदल्या झाल्या नसल्याने अवघड व दुर्गम भागात काम करणारे शिक्षक बदल्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.
जिल्हा व तालुक्यात अनेक ठिकाणी शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. प्रशासनाने बदल्या पारदर्शक होण्याच्या दृष्टीने संवर्ग 1, 2, 3 व 4 असे प्रकार पाडले असून, संवर्ग 3 म्हणजे अवघड क्षेत्रात 3 वर्षे काम करणार्यांना बदलीची संधी मिळते. 7 एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सात निकषांपैकी 3 निकष पूर्ण करणार्या शाळा अवघड म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. दि. 18 जुलै रोजी अवघड क्षेत्राची यादी जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केली. त्यानंतर गुरुजींचे बदलीचे अवघड होऊन बसले.
शासनाच्या निकषाप्रमाणे खेड तालुका संपूर्ण डोंगरी असून पश्चिम भागात अनेक शाळांमध्ये वाडी – वस्ती व गावांत वेळेवर जायला वाहतुकीची साधने सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक गावांत जंगली श्वापदांचा उपद्रव आहे. अनेक शाळा राज्य राष्ट्रीय महामार्गापासून 45 ते 50 किमीवर आहेत. त्या ठिकाणी फोनची रेंज नाही, काही गावांमध्ये पावसाळ्यात अतिवृष्टी होते. त्यामुळे संपर्क तुटतो. असे असतानाही अनेक शाळांचा अंतर्भाव अवघड क्षेत्र यादीत करण्यात आलेला नाही. यामुळे अवघड क्षेत्रात काम करणार्या शिक्षकांवर अन्याय होत असल्याचे चित्र दिसत आहे.
या यादीवर शिक्षक संघटनांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली असून, पुन्हा नव्याने यादी तयार करावी, अशी मागणी जुनी पेन्शन संघटना खेड तालुका यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.