पुणे : दीड दिवसाच्या गणरायाला निरोप मुठा नदीपात्रासह लोखंडी टाक्या, हौदात विसर्जन

दीड दिवसाच्या श्रींचे विसर्जन करताना भाविक.
दीड दिवसाच्या श्रींचे विसर्जन करताना भाविक.
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ढोल-ताशांच्या गजरात, आरत्यांच्या तालासुरात आणि गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बुधवारी आगमन झाल्यानंतर अवघ्या दीड दिवसाच्या पाहुणचारानंतर पुणेकरांनी लाडक्या गणरायाला वरुणराजाच्या साक्षीने गुरुवारी निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया…, पुढच्या वर्षी लवकर या…, गणपती निघाले गावाला… चैन पडेना आम्हाला… आदी घोषणांनी मुठा नदीपात्र, तसेच घाट परिसर दणाणून गेला. परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.

दुपारपासूनच मोरया रे… बाप्पा मोरया रे… चा जयघोष शहरातील रस्त्यांवर ऐकू येत होता. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाल्यानंतर पंचमी दिवशी दुपारनंतरच श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची पावले नदीपात्राकडे वळत होती. घाटावर ठेवण्यात आलेल्या टेबलावर आरती करून मोरयाच्या गजरात बाप्पांचे मुठा नदीपात्रात, तसेच हौदात विसर्जन करण्यात येत होते. विसर्जनादरम्यान अनुचित घटना घडू नये, यासाठी अग्निशामक दलातर्फे प्रमुख विसर्जन घाटांवर जवान आणि खासगी जीवरक्षक तैनात करण्यात आले होते.

शहरातील संगम घाट, वृध्देश्वर व सिध्देश्वर घाट, अष्टभुजेचे मंदिर, बापू घाट, विठ्ठल मंदिर, ठोसरपागा घाट, राजारामपूल घाट, सिध्देश्वर मंदिर, येरवड्यातील चिमा उद्यान, वारजे कर्वेनगर गल्ली क्रमांक 1, नेने घाट व आपटे घाट, ओंकारेश्वर, पुलाची वाडी, खंडोजीबाबा चौक, गरवारे महाविद्यालयामागील बाजू, दत्तवाडी, औंधगाव, बंडगार्डन, पांचाळेश्वर घाट अशा विविध ठिकाणच्या घाटांवर हौदातील पाण्यातच नागरिक श्रींच्या मूर्तींचे विसर्जन करीत होते.

प्रत्येक घाटावर जीवरक्षक, अग्निशामक दलाचे कर्मचारी नेमण्यात आले होते. मुठा नदीपात्रासह विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या लोखंडी टाक्या, तसेच हौदात लाडक्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. बहुतांश नागरिकांनी हौदातील पाण्यातच श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करणे पसंत केले. शहरासह उपनगरांतही रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जन सुरू होते.

निर्माल्य कलशाची सुविधा
महापालिकेच्या वतीने निर्माल्य संकलनासाठी घाटावर कलशाची सुविधा करण्यात आली होती. तेथे निर्माल्य विसर्जित करावे, अशी विनंती काही सामाजिक कार्यकर्ते करीत होते. घाटावर ठेवलेल्या कलशांमध्ये बहुसंख्य भाविक निर्माल्य अर्पण करताना दिसत होते.

हौद                     31 मूर्ती
लोखंडी टाकी        25 मूर्ती
संकलित मूर्ती         25 मूर्ती
एकूण विसर्जन       81 मूर्ती
निर्माल्य जमा       90 किलो

34 बांधीव हौद, 388 पाण्याच्या टाक्या
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरातील एकूण 34 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत 34 बांधीव हौद आणि 388 पाण्याच्या लोखंडी टाक्यांची व्यवस्था केली होती. यामध्ये, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सर्वाधिक दहा ठिकाणी बांधीव हौदाची व्यवस्था करण्यात आली होती. तर, वारजे-कर्वेनगर भागातील 57 ठिकाणी भाविकांनी लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जन केले. विसर्जनाच्या ठिकाणी मूर्ती दान, मूर्ती संकलन केंद्रासह निर्माल्य संकलनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news