

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गरजेपोटी 20 हजार रुपये दहा टक्के दराने व्याजाने घेतल्यानंतर वेळोवेळी त्या बदल्यात 32 हजार 500 रुपये गुगल पेद्वारे परत दिले. मात्र, त्यानंतर 40 हजार रुपये घेतले नसतानादेखील पती-पत्नीला डांबून 20 हजार रुपये जबरदस्तीने फोन पेद्वारे घेऊन धमकावणार्या दोघा सावकारांना चंदननगर पोलिसांनी अटक केली.
शुभम धनंजय जाधव (वय 26, रा. आंबेडकर वसाहत, बारामती), आशिष ऊर्फ अशोक मुरलीधर गायकवाड (वय 31, रा. बायबास रोड, मुंढवा ब्रीजजवळ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही मामा-भाचे आहेत. याबाबत बालाजीनगर धनकवडी येथील 28 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी 2021 पासून सुरू होता. फिर्यादी व्यक्तीने पैशाची गरज असल्यामुळे शुभम याच्याकडून 20 हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात वेळोवेळी फिर्यादीने आरोपीला गुगल पे व फोन पेद्वारे 32 हजार 500 रुपये परत केले होते.
मात्र त्यानंतरदेखील शुभम आणि त्याचा मामा आशिष हे दोघे फिर्यादीने घेतले नसतानादेखील 40 हजार रुपयांची मागणी करत होते. त्यातूनच दोघांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला साईनाथनगर खराडी येथील ऑफिसमध्ये डांबून ठेऊन बळजबरीने फोन पेद्वारे 20 हजार रुपये घेतले. त्यानंतर कोरे धनादेश घेऊन व्याजाची रक्कम साठ हजार रुपये ठरवून ती न दिल्यास घरी येण्याची धमकी दिली. 'हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादीने चंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली,' अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिली.
पत्नीच्या खुनाचा प्रयत्न
दागिने बँकेत गहाण ठेवून त्यावर घेतलेल्या कर्जाबाबत विचारणा केली म्हणून पतीने पत्नीचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पती संदीप शिवाजीराव घुले (वय 51, रा. वानवडी) याला अटक केली आहे. याबाबत 47 वर्षीय पत्नीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी घुलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 30) घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे दोघे पती-पत्नी आहेत. संदीपचा बिअर शॉपीचा व्यवसाय आहे.
पत्नीचे दागिने गहाण ठेवून त्याने बँकेचे कर्ज घेतले होते. दरम्यान, पत्नीने याबाबत पतीकडे विचारणा केली असता त्याने शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर मंगळवारी बेडरूममध्ये त्यांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादी पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीला अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.
पोलिस चौकीत तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
भर रस्त्यात विनयभंग केल्याप्रकरणी महर्षीनगर पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीने ओढणीने आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी 19 वर्षांच्या तरुणीवर आत्महत्येस प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी मोहसीन तन्वीर खान (वय 21, रा. गुलटेकडी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व मोहसीन खान हे दोघे ओळखीचे आहेत.
खान याने या 28 ऑगस्ट रोजी फोन करून गुलटेकडी येथील व्हेईकल डेपोच्या ग्राउंडमध्ये तिला बोलविले. ही तरुणी रात्री 11 वाजता तेथे गेली असता खान याने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या घटनेची तक्रार देण्यासाठी फिर्यादी आपल्या नातेवाईकांना घेऊन मंगळवारी महर्षीनगर पोलिस चौकीत आली होती. तिची तक्रार नोंदवून घेत असताना पहाटे 4 वाजता ओढणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिला असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिच्यावर आता आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साडेदहा लाखांचा गुटखा जप्त
गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गंज पेठेतील एका खोलीतून साडेदहा लाखांचा गुटखा आणि पानमसाला जप्त केला. याप्रकरणी ख्वाजा ऊर्फ साहिल अस्लम मुलाणी व शादाब मुश्ताक नाईकवाडी (राहणार दोघे गंज पेठ) यांच्या विरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार संजय भापकर यांनी फिर्याद दिली आहे. गुटखा विक्रीस राज्यात बंदी असतानादेखील दोघांनी त्याची बेकायदा साठवणूक करून ठेवल्याची माहिती गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता, गुटखा सापडला.