

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या शाळांमधील 30 ते 35 हजार विद्यार्थ्यांच्या पालकांचे बँकेत खातेच नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे शालेय साहित्यासाठी मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकाच्या संयुक्त बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांनी दिली. महापालिकेच्या 276 प्राथमिक व 46 माध्यमिक शाळांमधील साधारणत: 80 हजार विद्यार्थ्यांना 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून शालेय साहित्य खरेदीकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांना एटीएम कार्ड दिले जात होते.
मात्र यात अनेक अडचणी आल्याने, 2018-19 पासून डीबीटी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात थेट रोख रक्कम जमा केली जाते. पहिल्या वर्षी सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास मार्च महिना उजाडला होता. तर 2019-20 मध्ये फेब्रुवारीपर्यंत रक्कम पालकांच्या खात्यात जमा झाली होती. कोरोना आपत्तीतील दोन वर्ष वगळता ही योजना पुन्हा प्रभावीपणे यंदाच्या शैक्षणिक वर्षात अंमलात आणली जात आहे.
यातून 43 हजार विद्यार्थ्यांची बिले तयार करून 22 हजार विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात साडेआठ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित 21 हजार विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात शुक्रवारपर्यंत (22 जुलै) पैसे जमा होतील. उर्वरित 30 ते 35 हजार विद्यार्थ्यांच्या पालकांचे बँकेत खातेच नसल्याने त्या विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासाठी मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकाच्या संयुक्त बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत.