पुणे : तरस अन् गव्याची जोडी झाली ‘पुणेकर’

पुणे : तरस अन् गव्याची जोडी झाली ‘पुणेकर’

पुणे : पुढारी वृत्तसेवा  राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात नुकतेच नवे पाहुणे दाखल झाले आहेत. हे नवे पाहुणे केरळ येथून तब्बल आठ दिवस रस्त्याने प्रवास करून पुण्यात आले आहेत. एक तरसाची जोडी आणि एक गव्याची जोडी प्राणिसंग्रहालय प्रशासनाने सोमवारी रात्री उशीरा पुण्यात आणली. सध्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी आणि पक्षी यांचा संग्रह आहे. सस्तन प्राण्यांमध्ये प्राणिसंग्रहालयात आशियाई सिंह, पांढरा वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, हरीण, काळवीट, माकड आणि हत्ती यांचा समावेश होतो; तर सरपटणार्‍या प्राण्यांमध्ये भारतीय अजगर, कोब्रा , विविध प्रकारचे साप, भारतीय मगरी आणि भारतीय स्टार कासव यांचा समावेश आहे.

पक्ष्यांमध्ये मोर, घुबड यांसारख्या पक्ष्यांचाही समावेश आहे; तर नुकतेच प्राणिसंग्रहालय प्रशासनाने राज्यप्राणी शेकरू, रानमांजर, वाघाटी मांजर प्राणिसंग्रहालयात आणले आहे आणि आता सोमवारी रात्री या संग्रहात तरस या प्राण्याचीसुद्धा भर पडली आहे. आगामी काळात पुणेकरांना येथे अ‍ॅनाकोंडा, झेब्रा, जिराफ यांसह अनेक परदेशी प्राणी आणि पक्षीदेखील पाहायला मिळणार आहेत.

असा झाला केरळहून प्रवास
राजीव गांधी प्राणिसंग्रहालय प्रशासनाने तरस जोडी आणि गव्याची जोडी आणण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा पिंजरा बनविला होता. त्या पिंजर्‍यात राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाने पुण्यातून जाताना एक भेकराची जोडी आणि एक आफ्रिकन पोपट केरळ येथील प्राणिसंग्रहालयाला दिला. त्यांच्या बदल्यात प्राणिसंग्रहालयाने तरस जोडी आणि गव्याची जोडी आणली आहे. तब्बल 1700 किलोमीटर प्रवास करून हे प्राणी पुण्यात आणण्यात आले. तब्बल आठ दिवस रस्त्याने कंटेनर ट्रकच्या माध्यमातून हा प्रवास सुरू होता अन् सोमवारी रात्री हा प्रवास संपला.

प्राणी क्वारंटाइन…

प्राणिसंग्रहालयाने तरसाची जोडी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाइन केली आहे. येत्या एक-दोन दिवसांत ती पुणेकरांना पाहायला मिळेल. परंतु, गव्याची जोडी सध्या पुणेकरांना पाहण्यासाठी खंदकात सोडण्यात आली आहे.

प्राणिसंग्रहालयातील प्राणिसंख्या
सस्तन प्राण्यांच्या प्रजाती – 20 एकूण सस्तन प्राणी – 262
सरपटणार्‍या प्राण्यांची प्रजाती – 30
एकूण सरपटणारे प्राणी – 157
पक्ष्यांच्या प्रजाती – 12
एकूण पक्षिसंख्या – 25

प्राणी अदलाबदली, या कार्यक्रमांतर्गत केरळ येथून नुकतीच एक तरसाची जोडी आणि एक गव्याची जोडी आणण्यात आली आहे. पुणेकरांना प्राणिसंग्रहालयात हे प्राणी पाहायला मिळतील.
                – डॉ. राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, पुणे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news