पुणे : तर राज्यात पँथरची सत्ता असती : केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले

पुणे : तर राज्यात पँथरची सत्ता असती : केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'दलित पँथरची स्थापना अन्यायाविरोेधात लढण्यासाठी झाली, परंतु पँथरमध्ये फूट पडली. फूट पडली नसती, तर महाराष्ट्रात दलित पँथरची सत्ता असती,' असे मत केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. दलित पँथरला 50 वर्षे झाली, त्यानिमित्ताने पँथर चळवळीत शहीद झालेल्या कार्यकर्त्यांचे कुटुंबीय आणि हयात असलेल्या सुमारे 150 पँथरचा सन्मान करण्यात आला, त्या वेळी आठवले बोलत होते. या वेळी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, अर्जुन डांगळे, दिलीप जगताप, अविनाश महातेकर, गंगाधर आंबेडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आठवले म्हणाले, 'मुंबईत स्थापन झालेली पँथर जगभरात पसरली. त्या काळात अनेक आंदोलने करून अन्याय- अत्याचाराविरोधात उठाव केला. या चळवळीत दलित तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत होते. पँथर ही संघटना दुसर्‍याच्या नरड्याला नख लावणारी नव्हती. तर ज्या ठिकाणी अन्याय होत होता, त्याठिकाणी नरड्याला नख लावल्याशिवाय गप्प बसत नव्हती. चळवळीमध्ये वैचारिक मतभेद होऊन फूट पडली. मात्र, ती फूट पडली नसती तर राज्यातील सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन राज्यात सत्ता मिळाली असती.

' 'पँथर चळवळ पुन्हा नव्या जोमाने सुरू करावी, अशी अपेक्षा अनेक जण व्यक्त करत आहेत. त्यासाठी सर्वांना गट-तट विसरून एकत्र येऊन चर्चा करावी लागेल. दिशा ठरवून त्यादृष्टीने काम करावे लागणार आहे. पँथर नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांचे त्यांच्या जन्मगावी स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न करू,' असे आठवले यांनी सांगितले. '50 वर्षांत काय झालं, भविष्यात काय होणार आहे, यावर विचार करण्याची गरज आहे, त्यावर विचार झाला पाहिजे.

गटा-तटाचे राजकारण करत बसलो तर काही होणार नाही, त्यासाठी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. रामदास आठवले यांना मंत्रिपदाचे सुख भोगू द्यावे, असे वाटते. आपण एकत्र आलो तर सरकार कोणाचे आणायचे की, पाडायचे हे ठरविण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. मात्र, आपण गटा-तटांत अडकून पडलो. त्यातून बाहेर पडण्याची गरज आहे,' असे मत हंडोरे यांनी व्यक्त केले. डांगळे म्हणाले, 'दलित पँथर ही लेखकांनी सुरू केलेली चळवळ होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जनसामान्यांत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला आहे.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news