पुणे : ‘डिप्लोमा’ला ‘ऑनलाइन’चा फटका; 40 टक्क्यांच्या आसपास विद्यार्थी अनुत्तीर्ण

file photo
file photo

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्राच्या पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमांना ऑनलाइन शिक्षणाचा फटका बसल्याचे उघडकीस आले आहे. नुकताच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे (एमएसबीटीई) उन्हाळी सत्राचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये उत्तीर्णांचे प्रमाण 35 ते 40 टक्क्यांनी घसरल्याचे दिसून येत आहे.

तंत्रशिक्षण मंडळाकडून दहावी, बारावीनंतरचे पदवी तसेच पदविका अभ्यासक्रम चालविले जातात. मागील दोन वर्षे ऑनलाईन शिक्षणावर भर होता. मात्र, परीक्षा नेहमीच्या ऑफलाइन पद्धतीने झाली, याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसल्याचे संस्थाचालकांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रथमच एवढ्या प्रमाणावर निकाल घसरला असून, जवळपास निम्मे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

पदविका परीक्षा अनुत्तीर्ण झाल्याने अनेक विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. ऑनलाइन शिकवणी, प्रात्यक्षिकांच्या सरावाचा अभाव आणि बाहेरील प्रश्न यामुळे आधीच ग्रासलेले विद्यार्थी अधिक चिंतेत पडले आहे. त्यामुळे संबंधित परीक्षा ऑनलाइन पद्धतीने तातडीने घेण्याची मागणी काही प्राचार्यांनी केली आहे.

दोन वर्षांनंतर विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षा झाली. ऑनलाइन शिक्षण आणि ऑफलाइन परीक्षा, यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच फटका बसला आहे. विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्षच वाया जाण्याची शक्यता आहे. तंत्रशिक्षण मंडळाने अशा विद्यार्थ्यांचा विचार करून तातडीने पुनर्परीक्षा घेणे गरजेचे आहे.
                                                                                – तंत्रशिक्षण संस्थाचालक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news