पुणे : डिपॉझिटच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक

पुणे : डिपॉझिटच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दुसर्‍याचीच सदनिका डिपॉझिटची मोठी रक्कम घेऊन नंतर दुसर्‍या ठिकाणी राहा सांगत त्याचे भाडे देण्याचे
आश्वासन देऊन दिलेली 4 लाखांपैकी 3 लाख 80 हजारांची रक्कम परत न करणार्‍या महिलेवर लष्कर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिनाज मुर्तजा शेख (रा. म सोसायटी, बिस्मिला हॉल शेजारी, साईबाबानगर, कोंढवा) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अफरार अहमद शेख (48, रा. कोंढवा) यांनी अ‍ॅड. साजिद शाह यांच्या मार्फत लष्कर न्यायालयात खासगी दावा (156(3) नुसार) दाखल केला होता.

दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने अ‍ॅड. शाह यांनी सांगितले, 'फिर्यादी यांचा टेलरिंगचा व्यवसाय असून, त्यांचे पाच जणांचे कुटुंब आहे. जानेवारी 2021 मध्ये फिर्यादी हे राहण्यासाठी घर शोधत होते. त्या वेळी त्यांच्या एका मित्राने मिनाज शेख हिच्याबरोबर फिर्यादी यांची ओळख करून दिली दिली होती. त्यानुसार मिनाज हिने साईबाबानगर मधील बुशरा अ‍ॅव्हेन्यूमधील फ्लॅटची पॉवर ऑफ अटर्नी असल्याचे सांगून 4 लाखांच्या डिपॉझिटवर तो फ्लॅट फिर्यादी यांना दिला. या वेळी सुरुवातीला करारनामा करण्यासही टाळाटाळ केली. नंतर करारनामा केला. त्यात साडेतीन लाखांचा उल्लेख केला. उर्वरित रकमेबाबत विचारणा केली असता, वेगळा करारनामा बनवू, असे सांगितले. तिला महिना पाचशे रुपये आणि लाईटबिल फिर्यादीने भरण्याचे ठरले होते.

परंतु, लाईटबिलावर मिनाज हिचे नाव येत नसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी विचारणा करूनही तिने त्यांना सदनिकेची अद्यापही मालकी हस्तांतरित करण्यात आली नसल्याचे सांगितले. 2022 मध्ये सदनिकेच्या मूळ मालकाने फिर्यादींना बाहेर काढले. या वेळी मिनाजला विचारणा केल्यानंतर तिने तुम्ही चार महिने दुसर्‍या ठिकाणी राहा. त्याचे भाडे मी भरते म्हणत 3 लाख 70 हजारांचा पोस्ट डेटेड धनादेश दिला. तोदेखील वटला नाही. या वेळी तिला पैशाची मागणी करूनही तिने पैसे न देता शिवीगाळ करून धमकावले. त्यानंतर पोलिस ठाण्यात दाद न मिळाल्याने फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणी आदेश दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्येष्ठाच्या घरातून दागिन्यांची चोरी
ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेतून चोरट्यांनी नऊ लाख आठ हजारांचे दागिने चोरी केल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावरील मीरा सोसायटीत घडली. याप्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाची सदनिका मीरा सोसायटीत आहे. चोरट्यांनी सदनिकेतून नऊ लाख आठ हजारांचे 29 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी ऐवज लांबविल्याचे ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक येवले अधिक तपास करीत आहेत.

हेव्ही डिपॉझिट म्हणजे एखादी सदनिका, जागा, दुकान काही कालावधीसाठी मोठी रक्कम भरून करारतत्त्वावर घेतले जाते. बर्‍याच प्रकरणात यामध्ये मोठी रक्कम डिपॉझिट ठेवल्यामुळे यामध्ये भाड्याची आकारणी होत नाही. बहुतांशवेळी परिस्थिती, रकमेनुसार करार केला जातो. या प्रकरणात चार लाख डिपॉझिट मिनाज हिला देण्यात आले होते. ते तिने परत दिले नाही.
                                                          – अ‍ॅड. साजिद शाह, तक्रारदारांचे वकील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news