पुणे : ठेकेदार अडकणार ‘खड्ड्या’त! निकृष्ट कामे केलेल्यांवर उगारला जाणार कारवाईचा बडगा

पुणे : ठेकेदार अडकणार ‘खड्ड्या’त! निकृष्ट कामे केलेल्यांवर उगारला जाणार कारवाईचा बडगा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरातील बहुतांशी रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने ठेकेदारांचे दायित्व (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) असलेल्या 120 रस्त्यांपैकी केवळ विविध कामे झालेल्या रस्त्यांवरच पावसामुळे खड्डे पडल्याचा अजब दावा केला आहे. याबाबतचा अहवाल पथ विभागाने अतिरिक्त आयुक्तांना दिला आहे.निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतुकीची गती मंदावली आहे.

खड्ड्यांबद्दल तक्रारी वाढल्यानंतर अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दायित्व असलेल्या रस्त्यांचा अहवाल पथ विभागाकडून मागविला होता. या रस्त्यांवर खड्डे असल्यास ते संबंधित ठेकेदारांकडून बुजविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पथ विभागाने दायित्व असलेल्या 120 रस्त्यांची यादी आणि अहवाल डॉ. खेमनार यांना सादर केला आहे. यात ठेकेदाराकडे दायित्व असलेल्या 20 ते 25 रस्त्यांवर समान पाणीपुरवठा जलवाहिन्या, ड्रेनेज लाईन आणि इतर वाहिन्यांसाठी खोदाई करण्यात आली.

त्यानंतर योग्य प्रकारे रस्ते पूर्ववत केले नाहीत. त्यामुळे या रस्त्यांवर खड्डे पडले. तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या मार्फत केलेल्या 12 मीटर रुंदीपर्यंतच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. उर्वरित रस्ते चांगल्या स्थितीत असल्याचा अजब दावा पथ विभागाने केला आहे. दुसरीकडे जवळपास 90 ते 95 टक्के खड्ड्यांंची दुरुस्ती केल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासणार
काम करणार्‍या ठेकेदारांकडे रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे दायित्व असते. त्यामुळे ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासून संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाणार आहे. पुढील काळात रस्त्यांवर खड्डे पडू नये, तसेच रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी गुणवत्ता लक्ष ठेवण्याचे आदेश संबंधितांना दिल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news