पुणे : टोमॅटो, फ्लॉवर, शेवगा महाग; घेवडा, वांगी स्वस्त, मार्केट यार्डात 90 ट्रक शेतमाल दाखल

पुणे : टोमॅटो, फ्लॉवर, शेवगा महाग; घेवडा, वांगी स्वस्त, मार्केट यार्डात 90 ट्रक शेतमाल दाखल

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक घटली. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने टोमॅटो, फ्लॉवर, शेवग्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. तर, मागणीअभावी घेवडा व वांग्यांच्या भावात घसरण झाली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि. 4) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. बहुतांश फळभाज्यांची आवक-जावक कायम असल्याने दर टिकून होते.

परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये कर्नाटक येथून सुमारे 2 ते 3 टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथून 1 टेम्पो शेवगा, गुजरात येथून 2 टेम्पो कोबी, इंदौर येथून 8 ते 9 टेम्पो गाजर, गुजरात येथून 2 टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून 4 ते 5 टेम्पो पावटा व 3 टेम्पो घेवडा तर मध्य प्रदेशातून लसणाची 13 ते 14 ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 800 ते 900 पोती, टोमॅटो 5 ते 6 हजार क्रेटस, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, कोबी 7 ते 8 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, हिरवी मिरची 7 ते 8 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, भुईमूग 40 ते 50 गोणी, मटार 800 ते 900 गोणी, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा 70 ते 80 ट्रक यांसह इंदूर आणि आग्रा येथून बटाट्याची 30 ते 35 ट्रक इतकी आवक झाली.

पालेभाज्यांच्या भावात घसरण
रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक वाढली. आवकेच्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने कोथिंबिरीच्या भावात जुडीमागे 5 रुपये, कांदापात सहा रुपये, चाकवत दोन रुपये आणि पालकच्या भावात जुडीमागे तीन रुपयांनी घसरण झाली आहे.

तर, राजगिरा आणि चवळईच्या भावात एक रुपयांनी वाढ झाली आहे़ मागणी वाढल्याने मेथीच्या भावात तीन रुपये तर अंबाडी आणि चवळईच्या भावात प्रत्येकी एक रुपयाने वाढ झाली. रविवारी बाजारात कोेथिंबिरीची 2 लाख जुडी व मेथीची 80 हजार जुडी आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोंथिंबिरीचा आवक 50 हजार तर मेथीची आवक 30 हजार जुड्यांनी वाढली. रविवारी घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे भाव 5 ते 15 रुपये तर किरकोळ बाजारात 10 ते 30 रुपये इतके राहिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news