पुणे; पुढारी वृत्तसेवा: आरोपी किती ही चतुर असला तरी, तो अपराध करताना एखादा तरी पुरावा मागे ठेवतोच. खुन्याचा कोणताही सुगावा नसताना, येरवडा पोलिसांनी घटनास्थळावर सापडलेली पुरुषाची टोपी आणि चप्पलवरून घरातून बेपत्ता झालेल्या महिलेच्या 'मर्डर मिस्ट्री'ची उकल करण्यात यश मिळवले आहे. सतीश संतोष हारवडे (वय 45, रा. मूळ नांदेड जिल्हा, सध्या येरवड्यातील सादलबाबा दर्गा परिसरात फिरस्ती राहतो) असे अटक केलेल्याचे नाव आहे. महिलेने अत्याचार करण्यास विरोध केल्याच्या कारणातून त्याने हा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
त्यामुळे पोलिस सर्व बाबी गृहीत धरून त्याच्याकडे तपास करत आहेत. गीता राजेशकुमार कुंभार (वय 46, रा. ठाकरसी पाण्याच्या टाकीजवळ, पर्णकुटी पायथा, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव होते. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद खटके यांनी येरवडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शनिवारी (दि 30 जुलै) गीता या त्यांच्या मुलीसोबत खेडशिवापूर येथून आल्या होत्या. मुलीने त्यांना घरी आणून सोडले होते. रात्री साडे अकरा वाजता त्यांची मुलगी आपल्या घरी निघून गेली. मात्र, रविवारी (दि.31) पहाटे दीड वाजता गीता परत घरातून निघून गेल्या.
घरातील लोकांना वाटले नेहमीप्रमाणे येईल परत. त्यांचे मानसिक स्वास्थ ठीक नसल्याच्या कारणातून यापूर्वी देखील त्या घरातून निघून गेल्या होत्या, परंतु तसे झाले नाही. सोमवारी (दि.1) गीता यांचा मृतदेह येथील ठाकरसी पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या झाडीत अडगळीच्या जागेत सापडला. त्यांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करून त्यांचा खून करण्यात आला होता. मृतदेहाजवळ एक पिशवी मिळून आली. त्यामध्ये गीता यांची कागदपत्रे होती. त्यावरून त्यांची ओळख पटवण्यात आली.
असा झाला खुनाचा उलगडा
पोलिस निरीक्षक उत्तम चक्रे आणि त्यांच्या पथकाला खून झालेल्या ठिकाणी पुरुषाची टोपी आणि एक चप्पल मिळून आली होती आणि तेथूनच आरोपीच्या खुनाचा शोध सुरू झाला. घरातून निघाल्यानंतर गीता काही कॅमेर्यात दिसून येत होत्या. मात्र, घटनास्थळाच्या परिसरात त्या कशा आल्या, त्यांच्यासोबत कोण होते हे दिसून येत नव्हते. टोपी आणि चप्पल काय तोच पुरावा पोलिसांकडे होता. सुरुवातीपासून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या शोध घेतला. त्यावेळी आरोपी सतीश हा एका रिक्षात गीता बसल्या असताना त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.
परिसरातील एका कामगारानेदेखील याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. तेथील कॅमेर्यात सतीश याचा केवळ खांदा दिसत होता. त्यामुळे पोलिसांनी तेथे असलेल्या देशी दारूच्या दुकानाचा कॅमेरा पाहिला तेव्हा मृतदेहाजवळ मिळालेली टोपी त्याच्या डोक्याला असल्याचे पोलिसांना दिसले. त्यानुसार त्यांनी दोन्ही वस्तू दाखवून परिसरातील काही दुकानदारांना विचारले. पाच दिवस पोलिस त्याचा शोध घेत होते. कचरावेचक असल्यामुळे तो एका भंगारच्या दुकानात गेला होता.
त्यामुळे दुकानदाराने त्याला ओळखले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा परिसरात शोध घेतला, त्यावेळी तो तारकेश्वर मंदिराकडे असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबूल केला. सतीश हा घरी वाद करून पुण्यात आला असून, तो कचरा व भंगार वेचण्याचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, कर्मचारी प्रदीप सुर्वे, दत्ता शिंदे, कैलास डुकरे यांच्या पथकाने केली.