पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा ओढा जिल्हा परिषद शाळांकडे

Education policy
Education policy

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मराठी शाळांमध्ये गळती सुरू होऊन इंग्रजी शाळांमध्ये मुलांना शिकवण्याचा ट्रेंड होता. आता या ट्रेंडमध्ये बदल होत आहे. कारण 1 हजार 952 विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळांना रामराम ठोकून जिल्हा परिषदेच्या शाळेची वाट धरली आहे. तेरा तालुक्यांतील खेडमध्ये सर्वाधिक मुलांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. पुणे जिल्हा परिषद काही वर्षांपासून शाळांचा दर्जा, शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन पद्धत, शाळांमधील सोईसुविधा यांवर काम करत आहे. अनेक शाळांमध्ये बदल झाले, शिक्षणाची पद्धत सुधारल्याने दर्जाही सुधारला. त्याचा फायदा विद्यार्थी संख्या वाढण्यात होत आहे.

कोरोना काळात ऑनलाइन, तसेच ऑफलाईन शिक्षणावर भर दिला होता. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनीही ऑनलाइन शिक्षणावर भर दिला. कोरोनाने अनेकांचे अर्थकारण कोलमडले, रोजगार बुडाले. त्यामुळे शालेय शुल्क भरणे पालकांना अवघड झाले. शुल्क भरले नाही, तर ऑनलाइन शिक्षणही नाही, अशी बहुतांशी इंग्रजी शाळांनी भूमिका घेतली होती. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शक्य तिथे ऑनलाइन, तर जिथे शक्य नाही तेथे ऑफलाईन पद्धतीने शिक्षण देत होते.

वाड्या-वस्त्यांवर जाऊन तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत होते. पालकांशी सुसंवाद साधत होते. आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास उंचावत गेला. खेडमध्ये सर्वाधिक 386, तर शिरूरमध्ये 366 विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. त्याचबरोबर हवेली तालुक्यातील 264, मुळशीमधील 159 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी केलेल्या कामाला यश तर आलेच. शिवाय पालकांमध्ये जिल्हा परिषद शाळेचे आकर्षण वाढू लागले. मोफत शिक्षण, प्रत्यक्ष संवाद, गुणवत्ता सुधार, सेमी इंग्रजी यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश वाढू लागले आहेत.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या शुल्कवाढीमुळे काही विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत आले. मराठी माध्यमाच्या शाळांमध्येही इंग्रजीच्या माध्यमाच्या बरोबरीचे शिक्षण मिळते. पालकांची ओढ पूर्वीपासूनच जिल्हा परिषदेच्या शाळांकडे आहे. मध्यंतरीच्या काळात इंग्रजी शाळांचे आकर्षण होते, पण त्याच्याऐवजी गुणवत्तेच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेकडे हा कल वाढताना दिसत आहे.

                                   – संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा

इंग्रजी शाळा सोडून जि. प. च्या शाळेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी
तालुका संख्या
आंबेगाव 44
बारामती 123
भोर 47
दौंड 108
हवेली 264
इंदापूर 135
जुन्नर 32
खेड 386
मावळ 167
मुळशी 159
पुरंदर 115
शिरूर 366
वेल्हा 6

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news