पुणे जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्रांची सेवा पूर्ववत; तांत्रिक बिघाड दुरुस्त

पुणे जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्रांची सेवा पूर्ववत; तांत्रिक बिघाड दुरुस्त

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महा-ई-सेवा आणि सेतू केंद्राच्या महाआयटी सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे दाखले मिळण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. परंतु, आता ही समस्या दूर झाली. दाखल्यांची यंत्रणा पूर्ववत झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना महा-ई-सेवा केंद्रांतून दाखले मिळत आहेत. राज्य सरकारच्या महाआयटी विभागामार्फत महा-ई-सेवा आणि सेतू केंद्रांच्या माध्यमातून शासकीय परवानगी, जात पडताळणी दाखले-प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्र तसेच अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन देण्यात येतात. महाऑनलाइनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने या सर्व केंद्रांवरील कामकाज तांत्रिक कारणास्तव रखडले होते. त्यामुळे इतर कामकाजासाठी देखील या केंद्रांवर रांगा लागत होत्या. तसेच बिघाड असल्यामुळे केंद्रे बंद ठेवण्यात आली होती.

पुणे शहरात 250, तर ग्रामीण भागात 1 हजार 435 महा-ई-सेवा केंद्रे आणि 14 सेतू केंद्रे आहेत. मात्र, महा-ई-सेवा केंद्रावरील तांत्रिक बिघाडामुळे महाविद्यालयीन प्रवेश देखील रखडल्याने विद्यार्थ्यांकडून प्रशासनाकडे तक्रारी केल्या जात आहेत. काही महाविद्यालये प्रवेशासाठी दाखले आवश्यक असल्याचा आग्रह धरत होते. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना समस्या येत होत्या. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी इतर आर्थिक, वैद्यकीय कारणास्तव लागणारे उत्पन्नाचे दाखले वेळेत मिळत नसल्याने अनेक नागरिकांची कामे रखडली होती. परंतु, आता महा-ई-सेवा केंद्रातील समस्या दूर झाली असून, अर्ज स्वीकारले जात आहेत.

तांत्रिक बिघाडामुळे दाखले देण्याची यंत्रणा बंद होती. परंतु, आता राज्य सरकारच्या महाआयटी विभागातील तज्ज्ञांनी केलेल्या प्रयत्नामुळे तांत्रिक समस्या दूर झाली आहे. आता दाखले देण्याची प्रक्रिया पूर्ववत सेवा सुरू झाली आहे.

                                            – हिम्मत खराडे, निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news