पुणे : जिरेगावचा तलाव ऐनपावसाळ्यात कोरडाठाक

जिरेगाव (ता. दौंड) येथील कोरडाठाक पडलेला तलाव.
जिरेगाव (ता. दौंड) येथील कोरडाठाक पडलेला तलाव.

कुरकुंभ, पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील जिरेगाव येथील तलाव ऐनपावसाळ्यातही पाण्याअभावी कोरडाठाक पडला आहे. हा तलाव भरला जाईल एवढा पाऊस आतापर्यंत झाला नाही. गेल्या आठ महिन्यांपासून पाण्याची भीषण समस्या आहे. पाठपुरावा करूनही जनाई-शिरसाई योजनेचेदेखील पाणी मिळाले नाही. त्यामुळे जिरेगावकरांना 'कोणी पाणी देता का पाणी,' असे म्हणण्याची वेळ आली आहे.

जिरेगावच्या नागरिकांना दरवर्षी पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. जिरेगावासह वाड्यावस्त्यांवरील सद्यस्थितीत पाण्याची गंभीर परिस्थिती झाली आहे. प्रशासनाकडून जिरेगावकरांचा अंत बघितला जात आहे. तलावात अजिबात पाणी नाही. पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आहे. संबंधित ज्या अधिकार्‍यांकडून हा प्रश्न भिजत ठेवला जात आहे. त्यावर वरिष्ठांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.

पाणीप्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी जनाई उपसासिंचन योजनेवरील डाव्या कालवा (वाघदरा) ते जिरेगाव तलावापर्यंत तीन किलोमीटर जलवाहिनी टाकणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. राजकारणी व अधिकार्‍यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे ठरविल्यास तो त्वरित सुटू शकतो, मात्र तसे झाले नाही.

तलावाची पाणी साठवण क्षमता 60 दश लक्ष घन फूट आहे. 2 हजार 278 इतकी लोकसंख्या आहे. एकूण क्षेत्र 2169.2828 हे. आर. इतके आहे. यामध्ये शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. जनाई शिरसाई योजनेतून मिळणारे पाणी व पावसाचे पाणी तलावात जमा होते. ते पाणी वर्षभर वापरले जाते. जनाई शिरसाई योजनेतून सोडलेले पाणी तलावापर्यंत पोहचत नाही. ही मोठी अडचण आहे.

पाण्याने तळ गाठल्याने टँकरची मागणी केली, परंतु संपूर्ण उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला तरी टँकर काही सुरू केला नाही. याबाबत प्रशासनाला निवेदने दिली. स्थानिक राजकीय नेत्यांसमोर प्रश्न मांडला. मात्र, आजपर्यंत परिस्थिती जैसे थे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news