पुणे : चोरट्यांना पाठलाग करून पोलिसांनी पकडले

crime
crime

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जबरी चोरी करणार्‍या दोघा चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी पाठलाग करून पकडले. मुस्ताफा तन्वीर खान (वय 19), अशिष अभिमान आरणे (वय 23, दोघेही गुलटेकडी) अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चाकू, सोन्याचा बदाम असा 49 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 14 जुलै रोजी रात्री पावणेबारा वाजताच्या सुमारास एका व्यक्तीला स्वारगेट येथील गिरीधर भवन चौकाजवळ तिघांनी चाकूच्या धाकाने लुटले होते. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिस कर्मचारी सोमनाथ कांबळे, शिवा गायकवाड व अनिस शेख यांना ही जबरी चोरी मुस्ताफा व आशिष या दोघांनी केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भीमाले उद्यानाजवळ सापळा रचून दोघांना पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच दोघांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, वेळीच प्रसंगावधान राखत दोघांना पाठलाग करून पोलिसांनी पकडले. चौकशीत त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या पथकाने केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news