पुणे; पुढारी वृत्तसेवा: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मनसेकडून अमित ठाकरे यांना स्थान मिळण्याची आणि थेट गृहमंत्रिपद मिळण्याची चर्चा राज्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर 'गृहमंत्रिपद मिळाले, तर आनंदच होईल,' असे मत अमित ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. याच वेळी 'हे गृहमंत्रिपद राज ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील असावे,' असे म्हणत चर्चेतील हवाच त्यांनी काढून घेतली आहे. मनसे पक्षबांधणीसाठी राज ठाकरे यांचे पुत्र व मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौर्यावर आले आहेत. त्यांनी शनिवारी विद्यार्थ्यांसोबत पत्रकारांशीही संवाद साधला. या वेळी त्यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील सहभागाविषयी व गृहमंत्रिपदाविषयी विचारले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले.
'लोकांसाठी काम करण्याची आवड असल्यामुळे राजकारणात आलो. त्यामुळे सध्या महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या स्तराला पोहोचले आहे, याकडे मी फारसे लक्ष देत नाही. माझे लक्ष केवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी असतात. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मनसे विद्यार्थी सेनेची शाखा स्थापन करण्याचा निर्धार आहे,' असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
'महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक नसतात. त्यांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मनविसेच्या माध्यमातून केला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
'शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या समस्यांनंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्येवर लक्ष केंद्रित केले आहे,' असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.