पुणे; पुढारी वृत्तसेवा: गुंतवणुकीवर चांगले व्याज देण्याचे प्रलोभन दाखवून अनेक महिलांकडून घेतलेले पैसे परत न करता फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका 56 वर्षांच्या महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मनीषा बाबू मारणे (वय 35, रा. हनुमाननगर, केळेवाडी) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 15 सप्टेंबर 2017 ते 29 जुलै 2022 दरम्यान घडला. दरम्यान, कॅम्प परिसरात देखील एका महिलेने गुंतविलेले पैसे पंधरा दिवसांत दामदुप्पट देण्याच्या बहाण्याने अनेक महिलांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
मनीषा मारणे हिने फिर्यादी व इतर महिलांचा विश्वास संपादन केला. त्यांना फंडामध्ये पैसे गुंतविल्यास चांगले व्याज देण्याचे प्रलोभन दाखविले. फिर्यादींकडून 2 लाख 62 हजार 600 रुपये रोख रक्कम घेतली तसेच इतर महिलांकडूनही पैसे घेतले. फिर्यादी यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी पैसे परत मागितले. तेव्हा आपल्या फंडाचे पैसे बाहेर फिरवले आहेत. थोडे दिवस थांबा, मी तुमचे पैसे बुडवणार नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन फिर्यादी व इतर महिलांची फसवणूक केली. अनेकदा पैसे मागून देखील परत मिळत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार दिली. आतापर्यंत कोथरूड पोलिस ठाण्यात 8 महिलांनी तक्रारी दिल्या असून, पोलिस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.