पुणे : गरीब ‘लेकी’साठी 60 वर्षांचा बाप बॅडमिंटन कोर्टवर…

पुणे : गरीब ‘लेकी’साठी 60 वर्षांचा बाप बॅडमिंटन कोर्टवर…
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: एका गरीब शेतकर्‍याच्या खेळाडू मुलीला आर्थिक मदत करण्यासाठी 60 वर्षांचा एक बाप हातात रॅकेट घेऊन मैदानावर उतरला आहे. बाप-लेकीची ही अनोखी कहाणी मन हेलावणारीच आहे. राजसिंह हे पंजाबी गृहस्थ पुण्यात 60 वर्षांहून अधिक काळापासून वास्तव्यास आहेत. ते एकूण सात भावंडं. पाच भाऊ अन् दोन बहिणी. यात राजसिंग यांना लहानपणी बॅडमिंटन खेळाची आवड निर्माण झाली. लहानग्या राज यांनी आईकडे पाच रुपये किमतीची रॅकेट मागितली, मात्र आईने जरा थांब म्हणत वेळ मारुन नेली. कारण त्या काळात खेळाचे साहित्य घेऊन देणे आई-बाबांना परवडत नव्हते. पण, राज यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी रॅकेट मिळवलीच आणि मोठ्या स्पर्धा जिंकल्या, मात्र मार्गदर्शनाअभावी हा खेळ धंदा म्हणूनच राहिला.

गरीब वेटलिफ्टर लेकीसाठी सबकुछ..
राजसिंग यांना खेड तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथील एकता सोमनाथ वाळुंज ही मुलगी मदत मागायला आली. एकता गरीब शेतकरी कुटुंबातील असून, ती राष्ट्रीयस्तरावरची वेटलिफ्टर आहे. ती नुकतीच खेलो इंडियात 55 किलो वजन गटात खेळली. मात्र, परिस्थतीमुळे ती राजसिंग यांच्याकडे मदतीसाठी आली. राजसिंग यांनी तिला आपली मुलगी समजून मदत करण्याचा विडा उचलला अन् त्यासाठी बॅडमिंटन स्पर्धा भरवली. पीवायसी क्लब येथे अजय-राज ही स्पर्धा होत असून, एकताला त्यातून एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे.

साठाव्या वर्षी वर्ल्ड रँकिंग मिळवले…
राजसिंग हे गेली 48 वर्षे दररोज बॅडिमंटन खेळत आहेत. ते आता सिनिअर गटात म्हणजे 50 ते 55 वर्षे वयोगटातील खेळाडूंमध्ये खेळतात. या गटात त्यांना जगात तीन नंबरचे रँकिंग मिळाले आहे. सहा फूट उंच 78 किलो वजनाचे राजसिंग हे साठीतही जबदस्त फिट आहेत. ते शॉर्ट, टीशर्ट अन् हातात रॅकेट घेऊनच शहरात सतत फिरत असतात. समाजकार्याची आवड असल्याने त्यांनी सामाजिक संस्था सुरू करून त्या माध्यमातून गरीब खेळदडूंना मदत करणे सुरू केले.

हरूनही ते ठरले बाजीगर..
शनिवारी राजसिंग आपल्या लेकीसाठी एसए कॉर्पोरेट स्पर्धेत जिद्दीने उतरले. 50 ते 55 वर्षे वयोगटात ते सर्वांत वयाने मोठे 60 वर्षांचे, पण उत्साह तरुणाईला लाजवेल असा. एकेक सामना जिंकत अखेर ते अंतिम सामना हारले, पण उपस्थितांनी दाद देत त्यांचे कौतुक केले. तुफानी वेगाने कोर्टचे सर्व कोपरे व्यापत त्यांनी त्यांची चपळाई दाखवून दिली.

आज माझे वय साठ आहे, पण मी मनाने तरुण आहे. गेल्या 48 वर्षांपासून बॅडमिंटन खेळतो, कारण हा खेळ माझा श्वास आहे. हा खेळ श्रीमंतांचा समजला जातो. भारतात खेळ या प्रकारात खेड्यातील गरीब मुले मागे पडतात म्हणून मला खूप वाईट वाटते. यामुळे मी शीख हेल्पलाईनच्या माध्यमातून गरीब खेळाडूंना मदत करतो.19 वर्षांची एकता ही गरीब शेतकर्‍याची मुलगी राष्ट्रीय वेटलिफ्टर आहे. तिच्या मदतीसाठी आवाहन करताच भारतभरातून मला मित्रांनी तिच्यासाठी पैसे पाठवले. रविवारी तिला 1 लाखाचा धनादेश दिला जाणार आहे.

                                             – राजसिंग,ज्येष्ठ नागरिक व वरिष्ठ खेळाडू, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news