पुणे : गणरायाचे जल्लोषात स्वागत; भव्य मिरवणुका, ढोल-ताशांचा दणदणाट अन् वरुणराजाची हजेरी

श्री तुळशीबाग मंडळाच्या गणपतीची पुष्परथातून मिरवणूक काढण्यात आली.
श्री तुळशीबाग मंडळाच्या गणपतीची पुष्परथातून मिरवणूक काढण्यात आली.
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोनाचे सावट दोन वर्षांनंतर विरल्यानंतर संपर्णपणे निर्बंधमुक्त, मंगलमय वातावरणात, ढोल-ताशांच्या दणदणाटात गुरुवारी पुणे-पिंपरीकरांनी तसेच जिल्ह्यातील रहिवाशांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत मोठ्या उत्साहाने केले. सकाळपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी निघालेल्या मिरवणुका, बाजारातून घरगुती गणपती आणण्याची धांदल, सजावट अन् पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी उसळलेली गर्दी यांमुळे अवघे वातावरण गणेशमय झाले. बाप्पाच्या स्वागताला पावसानेही हजेरी लावली.

कोरोनाच्या साथीमुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सव सुनासुना गेला होता. मात्र कोरोना आटोक्यात आल्याने एकामागून एक निर्बंध शिथिल करण्यात आले आणि गणेशोत्सव संपूर्णपणे निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्याच्या सूचना मिळाल्याने सर्वांच्या उत्साहाला उधाण आले. त्यामुळेच गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी गेले दोन दिवस जंगी तयारी करण्यात येत होती. अखेरीस गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला आणि बाप्पाला घरी आणण्यासाठी रहिवाशांनी मूर्तिकार आणि दुकानांमध्ये गर्दी केली.

मंडई परिसर फुलून गेला. दुर्वा, फुले, शमी,,फळे तसेच प्रसाद यांची खरेदी होऊ लागली. गणेश प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त दुपारी एक वाजून 54 मिनिटांपर्‍यंतच असल्याचे पंचांगकर्त्यांकडून जाहीर करण्यात आले असल्याने त्याआधी घरचा गणपती आणण्याकरिता लगबग चाललेली दिसत होती. शनिवार वाड्याच्या परिसरात गणेशमूर्तींचे स्टॉल लावण्यात आले होते आणि संध्याकाळपर्यंत त्यातील बहुतेक स्टॉल रिकामे झाल्याचे दिसून आले.

सार्वजनिक मंडळांकडून सकाळी नऊ-साडेनऊ वाजेपासूनच मिरवणुका काढण्यात आल्या आणि रात्री उशिरापर्‍यंत ठिकठिकाणी मिरवणुकीने गणेशमूर्ती मंडळांकडे नेण्यात येत होते. मानाच्या तसेच इतर प्रमुख मंडळांपुढे दरवर्षी एक ढोल-ताशा पथक असे, मात्र यंदा काही मंडळांनी तीन-तीन पथके ठेवल्याने वातावरण दुमदुमून गेले.

या उत्सवी वातावरणात सहभागी होण्याचा मोह वरूणराजालाही आवरला नाही आणि दुपारनंतर काही जोरदार सरी पडल्याने वातावरणातील उष्मा कमी झाला. त्या आल्हाददायक वातावरणात मिरवणुकांना आणखीनच रंग भरला. बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजा आटोपल्यावर मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून सजावट पूर्ण करण्याची घाई सुरू झाली. पोलिस दलाने उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच वाहतुकीवर निर्बंध आणले आणि पर्‍यायी मार्गांवरून वाहतूक वळविण्यात आली.

तरीही काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दृश्य दिसत होते. काही मंडळांनी वाहतुकीचे भान राखत उंचावर मांडव उभारले असल्याने त्या खालून वाहतूक सुरू राहिली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणेच शहरातील मोठ्या सोसायट्यांनीही आपापल्या गणेशाची प्रतिष्ठापना मिरवणुकीने केली. काही सोसायट्यांनीही ढोल-ताशा पथके बुक केली असल्याने या सोसायट्यांच्या मिरवणुकाही सार्वजनिक मंडळांप्रमाणेच वाटत होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news