पुणे : गठ्ठ्यांमध्ये दडलंय काय? शनिवारवाड्याच्या आगीचे गुपित उलगडणार

पुणे : गठ्ठ्यांमध्ये दडलंय काय? शनिवारवाड्याच्या आगीचे गुपित उलगडणार
Published on
Updated on

दिनेश गुप्ता/आशिष देशमुख

पुणे : पेशवे दफ्तरात नेमके काय दडले आहे, याची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी अनेकवेळा चकरा मारल्यावर जुजबी माहिती मिळाली. या ठिकाणी तब्बल 4 कोटी कागदपत्रे 39 हजार रुमाली गठ्ठ्यांत बांधली आहेत. यात शनिवारवाड्याला लागलेल्या आगीचे गुपित दडले आहे. मात्र, त्या पत्रात नेमके काय लिहिले आहे, याची माहिती मिळू शकली नाही. 'पुढारी'ने या ठिकाणी जाऊन नव्या पिढीसाठी या दफ्तरात काय दडले आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या अखत्यारीत हे दफ्तर येते.

सर्व कागदपत्रे पुण्यात असली, तरी याचे मुख्यालय मुंबईत आहे. सुजितकुमार उगले हे संचालक आहेत. त्यांना आठ दिवस आधी मेल करूनही त्यांनी दखल घेतली नाही. कोणतीही माहिती देण्यास ते तयार नव्हते. 'तुम्ही मुंबईत या, मगच माहिती मिळेल,' असे ते म्हणाले. या दफ्तराच्या संवर्धनासाठी तीनवेळा मोठा निधी मिळाला, पण किती मिळाला, ते मात्र त्यांनी सांगितले नाही. तेथील कर्मचारी मेहनती व प्रामाणिक आहेत. पण, त्यांना बोलण्याची मुभा नाही. उगले यांची प्रचंड दहशत आहे. त्यांच्या भीतीपोटी मराठेशाहीचा इतिहास सांगण्याचे धाडस कुणी करीत नाही.

शनिवारवाड्याचे रहस्य…
या गठ्ठ्यांत पुणे शहरातील देवस्थानांचा तपशील, कात्रज येथील तलावाच्या बांधकामाचा हप्ता मिळाल्याचे पत्र, शनिवारवाड्याला लागलेल्या आगीचे 4 एप्रिल 1808 रोजीचे पत्र, विश्रामबागवाड्याच्या बांधकामाचा तपशील, भवानी पेठ वसाहत झाल्यापासून गुरू हुगलीशा फकीर यांना तेथे तकिया करावयास दिलेले पत्र, जेजुरी येथील कोठीपैकी सौ. सगुणाबाईंच्या (थोरले शाहूमहाराज यांच्या द्वितीय राणीसाहेब) समाधीसाठी झालेला खर्च, अशी दुर्मीळ कागदपत्रे आहेत. मात्र, सामान्य जनतेला याची माहिती नाही. ती सहजासहजी दाखवली जात नाही.

अभिलेख मोडी लिपीत
येथे 39 हजार रुमाली गठ्ठे आहेत. एका गठ्ठ्यात सुमारे 1 हजार कागदपत्रे व काही फायली आहेत. 80 टक्के अभिलेख मोडी लिपीत आहेत. 15 टक्के इंग्रजी, 5 टक्के गुजराती व कानडी लिपीत आहेत. बहुसंख्य कागदपत्रे 1707 ते 1890 च्या कालवधीतील आहेत.

  • 39 हजार गठ्ठे
  • शाहू दफ्तर 55
  • पेशवे कारकीर्द 780
  • प्रांताची कागदपत्रे 5297
  • पागा पथके लष्कर 962
  • चिटणीसी दफ्तर 267
  • आंग्रे दफ्तर -761
  • सातारा महाराज दफ्तर 3867
  • जमाव दफ्तर 7864
  • कर्नाटक दफ्तर 2461
  • सोलापूर जमाव 882
  • इनाम कमिशन चौकशी 1889
  • परत करण्याचे कागद 505

जबानी, निवाडापत्र, वतनपत्र, राजपत्र, जाहीरनामा
यात शिवपूर्व व शिवकालीन काळातील अतिदुर्मीळ कागदपत्रे आहेत. यात शहाजीराजे, छत्रपती शिवाजीराजे यांच्या काळातील देशमुख, देशकुलकर्णी यांच्या हक्काबाबतचा जाप्ता आहे. अफझलखान याचे वाई येथील कारकून व देशमुख यांना पत्र, थोरले शंभू छत्रपती यांचे हवेली पुणे येथील जमीनदार व रयतेस दिलेले पत्र तसेच त्या काळातील प्रसिध्द व्यक्तींची हस्ताक्षरे आहेत. ऐतिहासिक पत्रांचे विविध प्रकार आहेत. यात जबानी, निवाडापत्र, वतनपत्र, राजपत्र, जाहीरनामा, ताळेबंद, अशी दुर्मीळ कागदपत्रे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news