पुणे : खंडोबा मंदिराकडे जाणारा पूल झाला खुला

खंडोबाच्या मंदिराकडे जाणारा पूल वाहतूकीसाठी सुरू करण्यात आला.
खंडोबाच्या मंदिराकडे जाणारा पूल वाहतूकीसाठी सुरू करण्यात आला.

लोणी-धामणी, पुढारी वृत्तसेवा : धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री म्हाळसाकांत खंडोबा मंदिराकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावरील जुना दगडी पूल धोकादायक झाला होता. त्या ठिकाणी नवीन पूल पूर्ण झाला असून, तो वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

परिसरातील खंडोबाची माघ पौर्णिमेला भरणारी यात्रा ही जिल्ह्यातील मोठी यात्रा आहे. यात्रेदरम्यान लाखो भाविक येत असतात. देवस्थानाला जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरील हा पूल उपयुक्त होता. मुख्य रस्ता असल्यामुळे लाखो भाविक या रस्त्यावरील पुलावरून जात असतात. यात्रेच्या काळात बर्‍याच वेळा पुलाजवळ वाहतूक कोंडी होत असते, परंतु आता नवीन पूल मोठा झाल्याने वाहतूक कोंडी टळणार आहे. यात्रा वाहतूक कोंडीविना पार पडण्यासाठी मदत होईल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

अरुंद दगडी पूल असल्यामुळे प्रवासासाठी अनेक अडचणी येत होत्या. दोन वर्षांपूर्वी लोणी- ठाणे ही एसटी पुलावरील दगडावरून घसरली होती. पुलावरून खाली जाता जाता वाचली होती. परिणामी, हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागकडे केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर ती मान्य करत पूल वाहतुकीसाठी खुला केल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे. त्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत.

ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 50 लक्ष रुपये पुलासाठी मंजूर केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रथमेश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुलाचे काम झाले आहे.

                                                                                         – सागर जाधव, सरपंच

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news