पुणे : क्रीडा संकुलात सायकल शोरूम थाटल्याचे प्रकरण, मुख्य भाडेकरूला नोटीस

पुणे : क्रीडा संकुलात सायकल शोरूम थाटल्याचे प्रकरण, मुख्य भाडेकरूला नोटीस
Published on
Updated on

पुणे :  पुढारी वृत्तसेवा:  पुण्याच्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये सायकल शोरूम सुरू केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाची शासकीय पातळीवर दखल घेऊन संबंधित संस्थेला म्हणजेच मुख्य भाडेकरूला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. खेळाडूंना मैदाने उपलब्ध करून देणे हा क्रीडासंकुलाचा मूळ उद्देश आहे.

येरवडा येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये जलतरण, टेबल टेनिस, टेनिस, बॉक्सिंग आणि क्रिकेटसाठी काही अ‍ॅकॅडमी आणि संस्थांना भाडेतत्त्वावर मैदाने उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यामध्ये क्रिकेटसाठी अर्बन इन्फ—ाकॉन या संस्थेबरोबर करार करण्यात आला. मात्र, या संस्थेने पोट भाडेकरू ठेवला. या भाडेकरूने येथे सायकल विक्रीचा व्यवसाय थाटला आहे. या प्रकरणाची माहिती पुढे येताच शासनाच्या वतीने तातडीने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. या नोटिसीला संबंधित संस्थेचे अधिकारी काय उत्तर देणार, याकडे खेळाडूंचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर संबंधित जागा पुन्हा खेळाडूंना मिळेल का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

माजी अधिकार्‍याची चौकशी होण्याची शक्यता
येरवडा येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये गेल्या तीन ते साडेतीन महिन्यांपासून त्याठिकाणी सायकल शोरूम सुरू असल्याचे खेळाडूंचे म्हणणे आहे. या कालावधीमध्ये सेवानिवृत्त उपसंचालिका प्रमोदिनी अमृतवाड कार्यरत होत्या. त्यामुळे या प्रकरणाबाबत त्यांची चौकशी करणार का, असा प्रश्न खेळाडूंनी उपस्थित केला आहे.

सदर संकुलाचा अतिरिक्त चार्ज माझ्याकडे आलेला असून, सायकलचे शोरूम असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्वरित संबंधित संस्थेला कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. हा विषय विभागीय क्रीडा संकुल समितीचे उपाध्यक्ष आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासमोरही मांडला जाईल. तसेच समितीचे अध्यक्ष हे पालकमंत्री असल्याने तेच सर्वस्वी निर्णय घेऊ शकणार आहेत. पुण्याला अद्याप पालकमंत्री नसल्याने निर्णय प्रलंबित आहे. लवकरच त्यावर योग्य तो मार्ग काढू.
– महादेव कसगावडे, उपसंचालक, विभागीय क्रीडा संकुल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news