सुनील जगताप:
पुणे : 'क्रीडा व युवक सेवा संचालनालया'मध्ये अनेक वर्षांपासून रिक्त पदांची भरती रखडलेली आहे. त्यामध्ये कोरोनाचा फटका क्रीडा क्षेत्राला बसला आहे. या परिस्थितीत तालुका क्रीडा अधिकारी पदे भरण्याची प्रक्रिया क्रीडा खात्याने सुरू केली असून, सरळसेवेतून 15 तालुका क्रीडा अधिकार्यांची भरती केली जाणार आहे. राज्यातील खेळाडूंची गुणवत्ता वाढविण्याच्या द़ृष्टीने प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका क्रीडा अधिकारी असणे आवश्यक आहे.
मात्र, सद्य:स्थितीत क्रीडा अधिकार्यांची वाणवा असल्याचे दिसून येते. वास्तविक पाहता तालुका क्रीडा अधिकार्यांना 'डीएसओ' पदावर पदोन्नती मिळाल्याने ही पदे रिक्त झालेली आहेत. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने तालुका क्रीडा अधिकार्यांना पदोन्नती दिल्यास तब्बल 60 पदे रिक्त असणार आहेत. यामध्ये सरळसेवेची 31 आणि पदोन्नतीची 29 पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुका क्रीडा अधिकारी पदावर क्रीडा प्रशिक्षकांची वर्णी लावली जात असते. त्यामुळे या प्रशिक्षकांना आता तरी क्रीडा विभागाकडून न्याय मिळेल का असा प्रश्न प्रशिक्षकांना पडला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 15 तालुका क्रीडा अधिकारी भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण गटातून 9 पदे, महिलांची 5 पदे, तर एक पद अराखीव खुला गटातून भरले जाणार आहे. या पदासाठी 22 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत असून, त्या माध्यमातून तालुका क्रीडा
अधिकारी पदासाठी खेळाडूंना संधी मिळणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने तालुका क्रीडा अधिकार्यांची पदे भरण्याबाबत पावले उचलण्यात आलेली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 15 पदांना मंजुरी मिळाली असून, प्रक्रिया सुरू केलेली आहे. राहिलेल्या तालुका क्रीडा अधिकार्यांच्या पदांबाबत तूर्तास कोणतीच चर्चा झालेली नसून, लवकरच तो विषयही मार्गी लावू.
– ओमप्रकाश बकोरिया
(आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय)