पुणे; पुढारी वृत्तसेवा: डेल्टा विषाणूने राज्यातून काढता पाय घेतला आहे आणि ओमायक्रॉनच्या नवनवीन उपप्रकारांचा संसर्ग कमी झाला आहे. मात्र, या दोन्ही व्हेरियंटमध्ये झालेल्या अनेक म्युटेशनने (उत्परिवर्तन) अभ्यासकांना, शास्त्रज्ञांनाही चकित केले आहे. डेल्टामध्ये 25, तर ओमायक्रॉनमध्ये आतापर्यंत जवळपास 90 म्युटेशन झाल्याचा दावा जाणकारांनी केला आहे. भारतात वेगाने झालेल्या लसीकरणामुळे नवीन म्युटेशनपासून केवळ सौम्य स्वरूपाचा संसर्ग झाला.
राज्यात 9 मार्च 2020 पासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. सुरुवातीला झालेल्या अभ्यासातून कोरोनाचा प्रादुर्भाव मूळ विषाणूपासून सुरू झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर विषाणूमध्ये टप्प्याटप्प्याने म्युटेशन अर्थात उत्परिवर्तन झाले आणि नवनवीन उपप्रकार समोर येऊ लागले. कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये अनेक लोकांना तीव्र, मध्यम किंवा सौम्य स्वरूपाचा संसर्ग झाला.
दुसर्या लाटेत कोरोना
विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटचा वेगाने प्रादुर्भाव झाला. राज्यात नोव्हेंबर 2020 मध्ये डेल्टाचा शिरकाव सुरू झाला. मात्र, दुसर्या लाटेत म्हणजेच फेब्रुवारी ते एप्रिल 2021 या कालावधीत कोरोनाच्या संसर्गाने उच्चांक गाठला. आता डेल्टा व्हेरियंट हद्दपार झाल्याचे जिनोम सिक्वेन्सिंगमधून समोर आले आहे.
जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये विषाणूतील जेनेटिक मटेरियलचा अभ्यास केला जातो. यामध्ये विषाणूची ताकद किती वाढली, विषाणू किती गंभीर स्वरूपाचा आहे, त्यापासून संसर्गाचा धोका किती पटीने जास्त आहे, हे सर्व कयास बांधता येऊ शकतात. त्यामुळेच देशातील अनेक प्रयोगशाळा जिनोम सिक्वेन्सिंगच्या दृष्टीने सक्षम करण्यात आल्या.
दोन-अडीच वर्षांमध्ये झपाट्याने विषाणूमध्ये म्युटेशन झाले. काही व्हेरियंट मोजक्या रुग्णांमध्ये दिसतात आणि निघून जातात; तर काही व्हेरियंट जास्त काळ टिकतात आणि धोका निर्माण करतात. व्हेरियंटमुळे लसीची परिणामकारकता कमी होण्याची शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी म्युटेशनचा अभ्यास करून लसीमध्ये बदल करावे लागतात. त्यासाठी जिनोम सिक्वेन्सचे तंत्र महत्त्वाचे असते.
डॉ. अरविंद देशमुख, अध्यक्ष,
मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटमध्ये 20-25 म्युटेशन झाले. विषाणू स्वत:ला वाचवण्यासाठी सातत्याने रूपे बदलत असतो. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या बीए 2.75 मध्ये मात्र झपाट्याने 80-90 म्युटेशन झाले. ओमायक्रॉनच्या व्हेरियंटच्या स्पाईकमध्ये झपाट्याने बदल झाले. मात्र, या म्युटेशनमुळे सौम्य स्वरूपाचा संसर्ग झाला.
डॉ. राजेश कार्यकर्ते, समन्वयक,
इंडियन सार्स कोविड जिनोमिक कॉन्सोर्टियम (इन्साकॉग)