

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : प्लास्टिक (७५ मायक्रॉन) वापरावर बंदी असून कॅन्टोन्मेंट मधील कॅम्प परिसरातील १४ ठिकाणी छापेमारी करत तब्बल ४५० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. या छापेमारीत एकून ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती कॅन्टोमेंट बोर्डाचे आरोग्य प्रमुख आर.टी. शेख यांनी दिली.
राज्यात प्लास्टिक वापरावर १ जुलैपासून बंदी घालण्यात आली. त्यामध्ये प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग), डिश बाऊल, कंटेनर (डबे) आदीं प्रतिबंधित केले आहे. याशिवाय सजावटीसाठीचे प्लास्टिक व पॉलिस्टीरिन (थर्माकोल), प्लास्टिकचे आवरण असलेले मिठाईचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेटची पॉकिटे यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे.
कॅन्टोमेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाने प्लास्टिक विकणार्या आणि साठा करणार्या वितरकांना ६ जून रोजी नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी (७ जुलै) १४ ठिकाणी छापेमारी केली. यात तब्बल ४५० किलो प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे. तसेच त्यांच्याकडून ४५ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे. कॅन्टोमेंट बोर्डाचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुब्रत पाल यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभाग प्रमुख आर.टी. शेख, आरोग्य निरीक्षक प्रमोद कदम, संजय मकवाना यांच्यासह अतिक्रमण विरोधी पथकातील दहा जवानांनी ही कारवाई केली आहे.