पुणे : कुसगाव खिंडीत पुन्हा दरड कोसळली

पावसामुळे करंजावणे-शिवापूर रस्त्यावरील कुसगाव खिंडीत कोसळलेली दरड.
पावसामुळे करंजावणे-शिवापूर रस्त्यावरील कुसगाव खिंडीत कोसळलेली दरड.

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसामुळे वेल्हे तालुक्यातील करंजावणे-शिवापूर रस्त्यावरील कुसगाव खिंडीत दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. दरम्यान, तालुक्यातील या घाट रस्त्यावर कोसळणार्‍या दरडी तातडीने हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी मशीनसह पथके सज्ज केली आहेत.

शनिवारी (दि. 8) सकाळी कुसगाव खिंडीत दरडी कोसळल्या. त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तानाजी मांगडे यांनी तातडीने माहिती सार्वजिनक बांधकाम विभागाला दिली. त्यानंतर विभागाने जेसीबी मशीनने दरडी बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.

मुसळधार पावसामुळे या रस्त्यासह खरीव राजगड, पासली केळद आदी रस्त्यांवर पाण्याची डबकी साठली आहेत. खड्डे, चिखल राडारोड्यातून पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांना खडतर प्रवास करावा लागत आहे. राजगड, तोरणा, मढे घाट, गुंजवणी धरण भागात पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी गडावर गर्दी करत आहेत. मात्र, चाळण झालेल्या रस्त्यावरून त्यांची वाहने घसरत आहेत.

जेसीबी मशिनसह पथके सज्ज

वेल्हे तालुका सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय संकपाळ म्हणाले, 'कुसगाव खिंडीतील दरड तातडीने हटविण्यात आली. दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणी तातडीने कार्यवाही करण्यासाठी जेसीबी मशीनसह पथके सज्ज ठेवली आहेत. पावसामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्यात अडथळे येत आहेत. असे असले तरी आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात येत आहेत.'

कुसगाव खिंडीतील दरडी संरक्षित करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दरडी कोसळत आहेत. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. दरडी संरक्षित करून पाणी वाहणार्‍या चढ उतारावर काँक्रिटीकरण करण्यात यावे.

                                             – तानाजी मांगडे, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news