पुणे : कीर्तनकार महाराजांची फसवणूक; गुन्हा दाखल

पुणे : कीर्तनकार महाराजांची फसवणूक; गुन्हा दाखल

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  माझ्या संस्थेत तुमच्या ओळखीच्या लोकांना कामाला लावतो, असे म्हणत कीर्तनकार महाराज व त्यांच्या ओळखीतील लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वामी रामानंदजी महाराज उर्फ विनायक पांडुरंग उईके याच्यावर घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद महंत बेलनाथ महाराज यांनी दिली आहे.

फिर्यादी महंत बेलनाथ महाराज राजेवाडी (ता.आंबेगाव) यांची जानेवारी 2022 मध्ये प.पू. महंत 108 स्वामी रामानंदजी महाराज विनायक पाडुरंग उईके (रा. श्री संत भाकरे महाराज सेवा आश्रम, क्षेत्र चाधणी बर्डी, पोस्ट खराडी, ता. नरखेडा, जि. नागपूर) हे भीमाशंकर येथे आले असताना ओळख झाली होती.उईके याने महंत बेलनाथ महाराज यांना भारत साधू समाज संघटना, नवी दिल्लीमध्ये एक सदस्याची रिक्त जागा आहे. त्या जागेसाठी तुम्ही इच्छुक असाल तर मी नवी दिल्ली चॅरिटी कमिशनर यांचेशी बोलून तुमची नियुक्ती करतो असे सांगितले.

16 फेब्रुवारी 22 रोजी उईके याने महंत बेलनाथ महाराज यांना फोन करून 'आमचे ट्रस्टी तुम्हाला सभासद करून घेण्यास तयार आहेत. तुम्ही तुमचे पॅन-आधार-रेशनिंगकार्ड, बँक पास बुक, फोटो व 51 हजार रुपये सभासद फी पाठवा' असे सांगितले. महंत बेलनाथ महाराज यांनी संबंधित कागदपत्रे व्हॉट्सअ‍ॅपवर व 51 हजार रुपये रक्कम आरटीजीएस व फोन पेद्वारे पाठवली. उईके याने त्यानंतर महंत बेलनाथ महाराज यांना 'संस्थेसाठी चालक, दोन रखवालदार, कारकून, शिपाई असे लोक लागणार आहेत. तुमच्या ओळखीतील कुणी लोक असतील तर मला सांगा. मी त्यांना संस्थेत कामाला घेतो' असे सांगितले.

महंत बेलनाथ महाराज यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या ओळखीचे स्वप्नील बंडू माळी (रा. वढवणी, जि. बीड) यांना कारकून, नामदेव पानसरे (रा. मद, ता. जुन्नर) यांना शिपाई, सागर आहेर (रा. उल्हासनगर) यांना चालक, गिरीश खोकराळे (रा. हिवरे तर्फे नाराणगाव) यांचे प्रत्येकी 25 हजार, राहुल रमेश घोलप (रा. वाटखळ, ता. जुन्नर) रखवालदार यांचे 1 लाख व अक्षय गुंजाळ (रा. कादंळी वडगाव, ता. जुन्नर) रखवालदार यांचे 75 हजार अशी सहा लोकांची माहिती पाठिवली. उईके याने या लोकांना फोन करून त्यांच्याकडून आरटीजीएस व फोन पेद्वारे एकूण 3,51,000/- रु. घेतले होते.

फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्याने महंत बेलनाथ महाराज यांनी तुमची पोलिसात तक्रार करतो, असे वारंवार म्हणाल्यावर त्यांनी स्वप्नील बंडू माळी, नामदेव पानसरे, सागर आहेर यांचे प्रत्येकी 25 हजार रुपये असे एकूण 75 हजार रुपये परत केले. महंत बेलनाथ महाराज यांचे 51 हजार रुपये, गिरीश खोकराळे यांचे 25 हजार रुपये, राहुल रमेश घोलप यांचे 1 लाख रुपये, अक्षय गुंजाळ यांचे 75 हजार रुपये असे एकूण 2 लाख 51 हजार राहिलेले पैसे मागितले

असता उईके याने उडवाउडवीची उत्तरे देत शिवीगाळ केली. याबाबत आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच बेलनाथ महाराज यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून स्वामी रामानंदजी महाराज उर्फ श्री. विनायक पांडुरंग उईके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news