

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्याच्या पश्चिमेला असणारा आदिवासी भाग हा हिरवाईने नटला आहे. या भागातील पर्यटकांना फारसा माहीत नसणारा आंबे हातवीज येथील काचन ऊर्फ कांचन धबधबा व येथील अलौकिक निसर्गसौंदर्य पर्यटकांना भुरळ पाडत आहे. शनिवार व रविवार सुटीच्या दिवशी निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
जुन्नर शहरापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आंबे व हातवीज ही दोन गावे आहेत. या गावांना जाताना पर्यटकांना हिरवाईने नटलेला परिसर, छोटे मोठे धबधबे, तुडुंब भरलेली भातखाचरे, डोंगरावर पसरलेली धुक्याची दुलई मोहित करते. हातवीज येथील टेकडीवर वसलेल्या दुर्गादेवीचे दर्शन घेऊन पुढे हिरवाईने नटलेला कोकणकडा व येथील परिसरात असलेला पाझर तलाव पाहता येतो.
दुर्गादेवीचे दर्शन करून परतताना उजव्या वळणावर हातवीज गावाकडे जाणार्या रस्त्यालगत ज्योती हॉटेलपासून सुमारे दोन किलोमीटर पायी खाली उतरत गेल्यास काचन ऊर्फ कांचन धबधबा लागतो. या धबधब्याकडे जाण्यासाठी गावातूनसुद्धा पायी मार्ग आहे. पर्यटकांना अपरिचित असणारा हा धबधबा आता माहीत होऊ लागल्याने या धबधब्याची भुरळ पर्यटकांना पडली असून या ठिकाणी पर्यटकांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
दुर्गादेवी मंदिराच्या परिसरात वन विभागाने काही वर्षांपूर्वी पर्यटकांसाठी उभारलेली वेटिंग शेड, बाकड्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तर काही वेटिंग शेडचे पत्रे वार्याने उडून हे येथील पाझर तलावाच्या कडेला पडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च करून केलेल्या सुधारणांचा काही उपयोग होत नसल्याची खंत पर्यटकांकडून व्यक्त केली जात आहे.