

उरुळी कांचन, पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट ते कासुर्डीदरम्यानचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या हस्तांतराच्या वादाने देखभालीअभावी या महामार्गाची अवस्था गल्लीतील रस्त्याप्रमाणे झाली आहे.
या महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर विकसकाची टोल वसुलीची जबाबदारी संपल्यानंतर 23 मार्च 2019 पासून तो हस्तांतराच्या वादात खितपत पडला आहे. कवडीपाट ते कासुर्डीदरम्यानचा हा महामार्ग मे 2020 मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाला आहे. वास्तविक हा मार्ग देखभाल दुरुस्ती, तसेच रुंदीकरणाच्या दृष्टीने राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असणे क्रमप्राप्त असल्याचा निष्कर्ष काढल्याने पुन्हा हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावा, अशी मागणी केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.
राज्य व केंद्र सरकारची हस्तांतरणाची प्रक्रिया रेंगाळल्याने मात्र हा मार्ग स्थानिकांना धोकादायक ठरत आहे.
कवडीपाट ते कासुर्डीदरम्यान 2002 साली चौपदरीकरण करण्यात आले आहे. खासगी विकसकाकडून बीओटी तत्त्वावर या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. विकसकाने 2019 पर्यंत या महामार्गावरील टोलवसुली केल्यानंतर 23 एप्रिलनंतर हा मार्ग टोलमुक्त झाला आहे. हा रस्ता विकासकाच्या ताब्यातून सुटल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाल्याने मागील दोन वर्षांत फक्त तात्पुरती दुरूस्तीपलीकडे काम होत नसल्याने या महामार्गाची भयानक अवस्था झाली आहे.
कवडीपाट ते कासुर्डीदरम्यान लोखंडी बॅरिगेट, दुभाजकांची उंची, सिग्नल, मार्गावरील रंगरंगोटी यांची दुरवस्था झाली आहे. सपाटीकरण हे ठिगळ्यांनी वेढले आहे. रस्त्यांच्या दुभाजकामध्ये काटेरी बाभळी, मातीचा थर साचला आहे. व्यावसायिक अतिक्रमणांनी राष्ट्रीय महामार्गाची अवस्था गल्लीतील रस्त्याप्रमाणे केल्याने हा रस्ता महामार्गाच्या सर्व सुविधांपासून वंचित बनला आहे. या महामार्गावर दुभाजकांची उंची कमी असल्याने, फलक नसल्याने अपघात घडले, अशा एक ना अनेक कारणाने अनेकांचे मृत्यू ओढवले, मात्र मागील तीन वर्षांत कारवाई होत नसल्याचे मोठे दुर्दैव आहे. मागील काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी महामार्गावर डबकी साचली आहेत. महामार्गावर प्रचंड राडारोडा वाढला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या रस्त्याची देखभाली प्राधिकरणाच्या निकषांत बसत नसल्याचे कारणे सांगून देखभाल करीत नाही.
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्यास या देखभालीसाठी कंत्राटदार नेमून दुरुस्ती करता येणार असल्याचे अधिकारीवर्ग कारण सांगत आहे. दुसरीकडे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग व्हावा म्हणून दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत, मात्र वर्ग होत नाही. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग होऊन नव्याने तयार करणे आवश्यक बनले आहे.