पुणे : कचरा आणि डुकरांवरून हद्दीचा वाद

पुणे : कचरा आणि डुकरांवरून हद्दीचा वाद

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कचरा आणि डुकरांबद्दल महापालिकेच्या दोन विभागांमध्ये हद्दीचा वाद निर्माण झाला आहे. शहरात अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुत्री, डुक्कर यांसारखे प्राणी कचर्‍याच्या ढिगात रमत असल्याने नागरिकांना त्रास होतो. याबाबत नागरिक महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधतात. प्रत्यक्षात, कचरा हटविण्याचे काम घनकचरा विभागाचे असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
कचर्‍याचे ढीग साठल्याने त्याबाबतची तक्रार नागरिक आरोग्य विभागाकडे करतात.

कचर्‍याचा प्रश्न हा घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अंतर्गत आहे. रस्त्यावर कचरा टाकणार्‍यांना त्यांच्याकडून कारवाई होणे आवश्यक आहे, असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. कचर्‍याचा ढीग साचल्यानंतर तेथे प्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिक जीव मुठीत धरून जातात. कचरा उचलण्याचे काम घनकचरा विभागाचे, तर प्राण्यांचा बंदोबस्त करण्याचे काम आरोग्य विभागाचे आहे. यासंदर्भातील तक्रारी आल्यास त्या एकमेकांकडे सुपूर्त केल्या जातात. हद्दीच्या वादात नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये, अशी मागणी आहे.

आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही डुक्कर पकडण्याची कार्यवाही करतो, परंतु ज्या ठिकाणी कचरा, खाण्याचे पदार्थ असतात तिथे डुकरांना अन्न मिळते आणि त्यांचा वावर वाढतो. त्यामुळे वेळीच कचरा उचलला तर हा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते.

                – डॉ. सारिका पुंडे,पशुवैद्यक विभाग अधिकारी, पुणे महापालिका

शक्यतो घरोघरी कचर्‍याचे संकलन केले जाते. रस्त्यांवर कचरा टाकल्यास कर्मचार्‍यांमार्फत आपण कचरा उचलतो, याशिवाय असा कचरा टाकताना दिसल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. कुत्रे, डुक्कर समस्या असेल तर संबंधित क्षेत्रीय कार्यालयामार्फत आरोग्य विभागाला कळवले जाते.

                                              – आशा राऊत, घनकचरा व्यवस्थापन विभाग

logo
Pudhari News
pudhari.news