पुणे : ऐन गौरी-गणपतीमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत; अर्ध्याहून अधिक भागांत पाणी नाही

पुणे : ऐन गौरी-गणपतीमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत; अर्ध्याहून अधिक भागांत पाणी नाही

पुणे : मध्यवर्ती पेठांसह निम्म्याहून अधिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणार्‍या वाहिन्यांमध्ये रविवारी सकाळी बिघाड झाला. त्यामुळे ऐन गौरी-गणपतीच्या सणासुदीच्या काळात पुणेकरांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून हाल झाले, तर बिघाड दूर झाल्यानंतर सायंकाळी पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला.

रविवारी सकाळी नऊच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील पर्वती जलकेंद्राजवळ हा विद्युत बिघाड झाला. त्यामुळे या केंद्रातून शहरातील सर्व मध्यवर्ती भागातील पेठांचा भाग, सहकारनगर परिसर, कात्रज, धनकवडी, बालाजीनगर, सातारा रस्ता, बिबवेवाडी, पुणे स्टेशन परिसर तसेच पर्वती जलकेंद्रातून पाणीपुरवठा होणार्‍या लष्कर जलकेंद्रातंर्गत येणार्‍या हडपसर, वानवडी, कोरेगाव पार्क, मुंढवा तसेच कोथरूडच्या काही परिसराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही.

कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पाणीपुरवठा बंद राहिल्याने नागरिकांची गैरसोय झाली. त्यामुळे पर्वती जलकेंद्रावरील टँकर भरणा केंद्रावर नागरिकांनी हंडा- बादल्या घेऊन पाण्यासाठी रांगा लावल्या होत्या. दरम्यान, पाणीपुरवठा नक्की कधी सुरळीत होणार, याची माहिती नागरिकांना पालिका प्रशासनाकडून दिली जात नव्हती. काही माजी नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकार्‍यांना फोन केल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा बंद झाला असल्याची माहिती दिली.

महावितरणचे अधिकारी म्हणतात, आमचा संबंध नाही
महावितरणच्या केबलमध्ये बिघाड झाल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचणी आल्याचा दावा महापालिकेने केला असला, तरी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील केबलमध्ये बिघाड झाला आहे, त्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराशी आमचा काहीही संबंध नाही, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

महावितरणच्या केबलमध्ये सकाळीच बिघाड झाला, त्यामुळे पाण्याच्या टाक्या पुरेशा भरू शकल्या नाहीत. परिणामी, पाणीपुरवठा करण्यात अडचणी आल्या. परंतु, हा बिघाड दुरुस्त झाल्यानंतर ज्या भागाला पुरवठा होऊ शकला नाही, त्या भागात दुरुस्तीनंतर तातडीने पुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

                                                              – अनिरुद्ध पावसकर,
                                                                 प्रमुख, पाणीपुरवठा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news