

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकानजीकच्या आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए) पुनर्वसन करण्याची प्रक्रिया 14 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. मात्र, या जागेवरील आरक्षणच उठविल्याचा आरोप करत आनंदनगरमधील नागरिकांनी आज मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात विकसक आणि एसआरएच्या अधिकार्यांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली आहे.
आनंदनगर झोपडपट्टी 35 ते 40 वर्षे जुनी आहे. येथील काही कुटुंबीयांचे बिबवेवाडी येथील हिलटॉप हिलस्लोप येथे अनधिकृत बांधलेल्या इमारतींमध्ये पुनर्वसन सुरू आहे. या इमारती बेकायदा असल्याने झोपडपट्टीवासीयांनी त्या ठिकाणी विरोध केल्याने मागील आठवड्यात चांगलाच वाद रंगला. त्यात काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिवीगाळ आणि मारहाणही केल्याचा आरोप करत नागरिकांनी पोलिस आयुक्तांकडे ऑनलाइन तक्रार केली आहे.
आनंदनगर येथे एसआरए योजनेअंतर्गत इमारत बांधून नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येणार होते. हे काम स्टार कन्स्ट्रक्शनचे विकसक राकेश शर्मा हे करणार होते. परंतु यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मागील 14 वर्षांमध्ये प्रत्यक्ष फारशा हालचाली झाल्याच नाहीत. दरम्यानच्या काळामध्ये आनंदनगरमधील ज्या जागेवर एसआरएची योजना होणार होती त्या स.नं. 580/1/1/1 या जागेवरील एसआरएचे आरक्षणच वगळण्यात आले आहे. याची कुठलीही कल्पना आनंदनगरमधील नागरिकांना देण्यात आलेली नाही.
विकसक राकेश शर्मा आणि एसआरएच्या अधिकार्यांनी नागरिकांची फसवणूक केली आहे, असा आरोप करत नागरिकांनी 2002 पासून आजतागायत झालेल्या पत्रव्यवहाराचे पुरावेदेखील यासोबतच जोडले आहेत. विशेष म्हणजे 9 डिसेंबर 2021 मध्ये शहर सुधारणा आणि सर्वसाधारण सभेमध्ये येथील लगतच्याच स.नं.577,578 आणि 579 मध्ये कलम 205 अन्वये 24 मीटर रस्ता आखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच जागेवरील 30 मीटर रस्ता रुंदी ऑक्टोबर 2019 मध्ये वगळण्यात आली होती. वस्तीतून जाण्यासाठी आखण्यात आलेला 24 मीटर रुंद रस्ता रद्द करावा, असे पत्रही यावर्षी एप्रिलमध्ये महापालिका आयुक्तांना दिले होते, असे आंदोलकांनी पोलिसांकडे दिलेल्या पुराव्यांवरून समोर येत आहे.