पुणे : ‘एमटीडीसी’कडून पर्यटकांना खास सवलती

पुणे : ‘एमटीडीसी’कडून पर्यटकांना खास सवलती
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पुणे विभागाकडून खास सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील घाटमाथ्यावर कोसळणारा पाऊस सध्या ओसरला आहे. पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे पर्यटकांची पावले पर्यटनाकडे वळत आहेत. पुणे विभागातील महाबळेश्वर, लोणावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, पानशेत, सिंहगड, कोयना या ठिकाणी पर्यटकांची खास पसंती मिळत आहे. याबाबत पर्यटन महामंडळाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले, 'वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्यक्ष शहरात राहणार्‍या लोकांना त्याच त्या गर्दीचा, मॉल संस्कृतीचा, वाहतूक कोंडीचा, संगणकीय मनोरंजनाचा आणि एकंदरीत धकाधकीचा नागरी जीवनमानाचा कंटाळा आला आहे.

अशावेळी शहरापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी मनमुराद पावसाचा आणि दाट धुक्याचा अनुभव घेण्यास पर्यटक आसुसलेले आहेत. वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी उत्साही पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. मात्र, वर्षा पर्यटन करताना धोकादायक ठिकाणांपासून सावध राहणे, शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. जीव धोक्यात घालून सेल्फी काढणे, निसरड्या धबधब्यांच्या ठिकाणी जाणे, अनोळखी जंगलातून भ्रमंती करणे सर्वतोपरी टाळावे यासाठी महामंडळ आग्रही असून, त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना महामंडळांच्या पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटकांना दिल्या जात आहेत.'

ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी यांना आगाऊ आरक्षणासाठी सवलती देण्यात येत आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी – माजी सैनिक आणि शारीरिक विकलांग नागरिकांसाठी खास सवलती दिल्या आहेत. समूह आरक्षणासाठी 15-20 खोल्यांपेक्षा जास्त आरक्षण केल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठी खास सवलती देण्यात येत आहेत. तसेच काही नावीन्यपूर्ण निर्णय घेताना महामंडळानेही पर्यटकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मोफत न्याहारीची सुरुवात केली आहे, असेही हरणे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news