पुणे : एटीएम फोडून आठ लाख पळविले

वेळू (ता. भोर) येथील गॅस कटरने तोडलेले एटीएम. (छाया : किरण दिघे)
वेळू (ता. भोर) येथील गॅस कटरने तोडलेले एटीएम. (छाया : किरण दिघे)
Published on
Updated on

खेड शिवापूर, पुढारी वृत्तसेवा : पुणे – सातारा महामार्गावरील वेळू (ता. भोर) येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे 'एटीएम मशिन" गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील 7 लाख 96 हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 9) पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडला. राजगड पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेळू येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेलगत एटीएम मशिन आहे. सदर एटीएम 9 ऑगस्टला पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील 7 लाख 96 हजार 400 रुपये पळविले. याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सचिन पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज कुमार नवसरे, उपनिरीक्षक श्रीकांत जोशी व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.

चोरांचा माग काढण्यासाठी श्वानाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी भेट दिली आहे. या तपासासाठी राजगड पोलिसांनी दोन पथके तयार केली आहेत. तपास उपनिरीक्षक श्रीकांत जोशी करीत आहेत.

सदर बँकेत सुरक्षारक्षक असणे आवश्यक आहे. तसेच परिसरामध्ये उच्च दर्जाचे सीसीटीव्ही व लाईट लावणे आवश्यक आहे. यासंदर्भात पत्रव्यवहार सदर बँकेशी करण्यात आला होता. मात्र, संबंधित सूचनांकडे बँकेने दुर्लक्ष केले, असे राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news